राज्यात बचतगटांच्या चळवळीला चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अभियान राबविण्यात येत आहे. उमेद या शब्दातच योजनेचा सगळा सार सामावला आहे. उमेद ही कार्यकर्तृत्वाला चालना देणारी, मनाला उभारी देणारी गोष्ट. उमेद असेल तर माणूस पुन्हा उभे राहू शकतो. याच उमेदने लाखो स्त्रियांना स्वरोजगाराची वाट दाखवली. त्यांच्यातील कौशल्याला नवे पंख दिले. यामध्ये गरीबी निर्मूलनाचा समग्र विचार करण्यात आला असून समुदाय विकासापासून शाश्वत उपजीविका निर्माण करण्यापर्यंतच्या सर्व बाबींचा यात समावेश आहे. या योजनेतून बचतगटाद्वारे स्त्रियांचे संघटन करून त्यांच्यातील उद्योग व्यवसायाला चालना देण्यात येते.

उमेद गावपातळीपर्यंत कशी पोहोचली आहे ?

राज्यात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समुदाय संसाधन व्यक्तींची एक भक्कम फळी गावपातळीपर्यंत उभी केली गेली आहे. समुदाय संसाधन व्यक्तीमार्फत गरीब कुटुंबांची नेमकी ओळख करून त्यांना स्वयंसहाय्यता गटात समाविष्ट करण्याचे मोलाचे काम या अभियानांतर्गत केले जाते. समुदाय संसाधन व्यक्ती या स्थानिक स्त्रिया असून त्या समुदाय संस्थाचा एक भाग म्हणून काम करतात.

उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची राज्यात १५ जिल्ह्यात आणि १३४ तालुक्यात इन्टेन्सिव्ह पद्धतीने तर उर्वरित तालुक्यात सेमी व नॉन इन्टेन्सिव्ह पद्धतीने अंमलबजावणी होत आहे. सेमी आणि नॉन इन्टेन्सिव्ह तालुक्यांचे रुपांतर टप्प्याटप्प्याने इन्टेन्सिव्ह तालुक्यात केले जाईल.

उमेदअंतर्गत कर्ज पुरवठा कशाप्रकारे उपलब्ध करून दिला जातो ?

राज्यात उमेद अंतर्गत एकूण १ लाख ८१ हजार बचतगट स्थापन झाले आहेत. अभियानाची बांधणी करतांना स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अभियानात समाविष्ट असणारे सर्वच उपक्रम हे स्त्रियांसाठीच आहेत. स्त्रियांचे स्वयंसहाय्यता गट तयार झाल्यानंतर आणि त्यास तीन महिने पूर्ण झाल्यानंतर १० हजार ते १५ हजार रुपये एवढा फिरता निधी (RF) दिला जातो. याचा उपयोग गटातील स्त्रिया त्यांच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी तसेच व्यवसायासाठी करू शकतात. गट सहा महिन्यांचा झाल्यानंतर त्या गटातील प्रत्येक सदस्यांचा सूक्ष्म गुंतवणूक आराखडा तयार करून त्या गटास ६० हजार रुपये एवढा समुदाय गुंतवणूक निधी (CIF) दिला जातो. अतिगरीब व जोखीमप्रवण कुटुंबासाठी प्रती ग्रामसंघ ७५ हजार तर बँकांमार्फत प्रत्येक गटास १ लाख रुपये एवढ्या रकमेचे पहिले कर्ज दिले जाते. या उपलब्ध होणाऱ्या निधीतून स्त्रिया त्यांच्याकडे असणारे कौशल्य, संसाधने व त्यांची इच्छा या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून व्यवसायाची निवड करतात. स्त्रियांना त्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी तसेच क्षमताबांधणीसाठी उमेद अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. या अभियानाचा लाभ गावातील सर्व गरीब स्त्रिया घेऊ शकतात. त्यासाठी त्यांनी स्वयंसहाय्यता गट किंवा बचतगटात सहभागी होणे आवश्यक आहे.

उमेदमधील लाभ घेण्यासाठी कुठे संपर्क साधावा ?

या अभियानात सहभागी होण्यासाठी गावाच्या जवळ युनिट म्हणून इन्टेन्सिव्ह तालुका अभियान व्यवस्थापक, तालुक्यात तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तर सेमी आणि नॉन इन्टेन्सिव्ह क्षेत्रात गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे संपर्क साधावयाचा असतो.

उमेदमुळे स्त्रियांना गरीबीतून बाहेर पडण्यास मदत होत आहे तसेच त्यांच्या उपजीविकेचे स्त्रोत बळकट होत जातांना त्यांची आत्मसन्मानाची वाट अधिक सक्षम होत आहे. http://www.umed.in या संकेतस्थळावर जाऊन या अभियानाची माहिती आपण घेऊ शकाल.

-इर्शाद बागवान

माहिती स्रोत: महान्युज