सातारा जिल्ह्याच्या वाई येथील रेश्मा गाढवे आणि विशाल गाढवे या दोघांनीही मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन आपआपले व्यवसाय सुरु केले. आज दोघेही वाई सारख्या ठिकाणी उत्तम व्यवसाय करत असून मुद्रामुळे त्यांच्या संसाराला हातभार मिळाल्याची भावना ते व्यक्त करतात. रेश्मा गाढवे यांनी दहावी झाल्यानंतर काही कारणाने शिक्षण बंद केले होते. दरम्यानच्या कालावधीत ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेऊन स्वत:चे पार्लर सुरु केले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाई शाखेतून दोन लाखांचे कर्ज घेऊन हा व्यवसाय त्यांनी वाढवला. या व्यवसायाच्या जोडीने सध्या त्या पार्लरचे मोफत प्रशिक्षण महिलांना देत आहेत. यामधून स्वत:सारखेच महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याची त्यांची धडपड आहे. मुद्रा बँक योजनेबद्दल समाधान व्यक्त करुन रेश्मा गाढवे म्हणतात, महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी मुद्रा बँक योजना ही अतिशय फायदेशीर आहे. सध्या मी पार्लरच्या व्यवसायातून आर्थिक प्रगती साधली आहे. त्याचबरोबर मुक्त विद्यापीठातून पुढील शिक्षणही पूर्ण करत आहे. माझ्या व्यवसायवाढीसाठी मुद्रा बँक योजनेचा खूप मोठा आधार मिळाला असून त्याच्या जोरावरच मी माझ्या संसाराला हातभार लावीत आहे. त्यांचे पती विशाल गाढवे यांनीही मुद्रा मधून दोन लाखांचे कर्ज घेऊन महा ई-सेवा केंद्र सुरु केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून ते चांगले अर्थार्जन करत आहेत. त्यांच्या या महा ई-सेवा केंद्रात दोन महिलांनाही त्यांनी रोजगार दिला आहे. महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय कागदपत्रे उपलब्ध करुन ते स्वत: बरोबरच शासनाचाही फायदा करीत आहेत. मुद्रामुळे स्वत:चा व्यवसाय - सारिका महांगडे एका खासगी हॉस्पिटलमध्ये मी नोकरी करीत होते. ही नोकरी करत असतांनाच मी पार्लरचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रमधून मुद्रा योजनेअंतर्गत दोन लाखांचे कर्ज घेतले आणि मी माझा पार्लरचा स्वतंत्र व्यवसाय करु लागले. आज या व्यवसायातून मला महिन्याला खूप चांगला फायदा होतो. त्यामुळे कोठेही नोकरी करायची गरज नाही. भविष्यातही मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यवसाय करण्याची माझी इच्छा आहे. या योजनेमुळे मी समाधानी आहे. मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून गाढवे पती पत्नींनी दोन-दोन लाखांचे कर्ज घेऊन भाड्याने गाळे घेऊन आपआपले व्यवसाय सुरु केले आहेत. दोघेही या व्यवसायातून महिन्याला चांगला आर्थिक नफा मिळवत आहेत. गाढवे पती-पत्नींच्या संसाराला शासनाच्या मुद्रा बँक योजनेचा खूप मोठा हातभार लागला आहे. त्याचबरोबर सारिका महांगडे याही मुद्रामुळे स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. ही उदाहरणे छोटे व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी तसेच व्यवसाय वृध्दी करणाऱ्यांसाठी प्रेरणा देणारी आहेत. लेखक - प्रशांत सातपुते जिल्हा माहिती अधिकारी, सातारा. स्त्रोत - महान्युज