समाजकारण आणि राजकारण यांची उत्तम सांगड घालून महिला सक्षमीकरणाचा लढा लढणाऱ्या आणि त्याची दखल संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेला घ्यायला लावणाऱ्या लातूर जिल्ह्यातील मायाताई सोरटे यांच्या व्यक्तिमत्वाची आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ओळख करून देणारा हा विशेष लेख... राजकारणाचा कसलाही गंध नसणारी एक सामान्य महिला लग्नानंतर सासरी आल्यानंतर गावातील महिलांचे प्रश्न आणि व्यथा ऐकते, त्यामुळे अस्वस्थ होते आणि त्याविरुद्ध लढण्यासाठी स्वतःचं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करुन सामाजिक कार्याचा वसा घेऊन करून सक्रीय राजकारणात उतरते. तिथे भरीव कामगिरी नोंदवत आपल्या कामाची दखल संयुक्त राष्ट्रसंघासारख्या संघटनेला घ्यायला भाग पाडते आणि न्यूयॉर्क येथे भरलेल्या ५० व्या पंचायतराज विषयक परिसंवादात देशाचं प्रतिनिधित्व करत २५० डॉलर्सचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावते. खरं तर ही कुठल्याही चित्रपटाला शोभावी अशी कहाणी. पण ही यशोगाथा आहे लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ या गावाचे सरपंचपद भूषवत महिला सरपंच म्हणून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या ‘माया सोरटे’ यांची. मायाताई यांची आज जी ओळख आहे तशी ती होण्यासाठी त्यांचा भवताल बिलकुलच अनुकूल नव्हता. तसा कुठल्याही स्त्रीचा त्यातही ग्रामीण स्त्रीचा भवताल प्रतिकूल असणं ही काही नवी बाब नाही, पण त्यातूनच तिच्या व्यक्तिमत्वाचा बंदा रुपया लखलखून उठतो. आजसुद्धा मायाताई ग्रामपंचायत सदस्या म्हणून काम करतांना महिला सक्षमीकरणाचा लढा जोमाने लढताहेत. मायाताईचा जन्म लातूर जिल्ह्यातील खरोळा या छोटेखानी गावातला. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच, पण एकत्र कुटुंबात इतर ४ भावांसह त्यांची जडणघडणच अशी झाली की त्या खूप बिनधास्त आणि निडर बनल्या. लहानपणी आजोबांकडे असताना घोडेस्वारी केल्याची आठवणदेखील त्या सांगतात. त्यांच्या या टॉमबॉय सारख्या वागण्यामुळे गावातील जुन्याजाणत्या लोकांकडून पोरीच्या अशा वागण्याने पोरीचं लग्न होईल का, आणि झालंच लग्न तरी पोरगी नांदेल का..? अशा प्रश्नांचा भडीमार केला जाऊ लागला. परिणाम असा झाला की, वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्याचं लग्न लावण्यात आलं. मामाच्याच घरी वडवळ नागनाथ येथे त्यांचं लग्न झालं. सुरुवातीच्या काळात गावातील महिलांशी त्यांचा मोठ्या प्रमाणात संपर्क आला, त्यामुळे त्यांच्या व्यथा, अडचणी समजू लागल्या. त्या ऐकून मायाताई अस्वस्थ झाल्या. या महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना तीव्रतेने वाटू लागलं. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम स्वतःच अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मायाताईंनी प्रौढ शिक्षणाच्या वर्गात गावातील इतर महिलांना शिकवायला सुरुवात केली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. गावातील महिला लिहित्या-वाचत्या झाल्या. पण केवळ अक्षरओळख पुरेशी नाही, महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावं म्हणून ‘स्वयंशिक्षण प्रयोग’ या संस्थेच्या मदतीने त्यांनी गावात महिला बचत गटाचे काम सुरु केले. ‘सावित्रीबाई फुले बचत गट’ नावाने पहिला बचत गट स्थापन करण्यात आला. १९९७ साली दहा रुपये प्रति महिना अशा पद्धतीने सुरु झालेल्या या बचत गटाच्या आज जवळपास ५०० महिला सदस्य आहेत. अशाप्रकारे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यात, मायाताईचा मोठा वाटा आहे. आर्थिक सक्षमतेनंतर महिलांचा निर्णय प्रक्रियेतील म्हणजेच पर्यायाने राजकारणातील सहभाग वाढावा असे मायाताईंना मनोमन वाटू लागले. समाजातील सर्वात शोषित घटक म्हणजे महिला, ही महात्मा फुल्यांची मांडणी समोर दिसू लागली. ही मांडणी आजदेखील कालसुसंगत असल्याची खंत दाटून आली. याविरोधात लढण्यासाठी सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील सत्ता महिलांनी आपल्या हातात घेतली पाहिजे असं तीव्रतेने वाटू लागलं. दरम्यानच्या काळात त्यांचा ‘महिला राजसत्ता आंदोलना’शी संबंध आला होता. त्यातूनच ग्राम पंचायतीची निवडणूक लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मायाताई विरोधातील महिलेने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांची तर बिनविरोध निवड झाली. ग्राम पंचायतीतमध्ये तर प्रवेश झाला पण तिथे काम करतांना त्यांच्या असे लक्षात आले की, त्यांच्याशिवाय इतर कुठलीच महिला बैठकीला उपस्थित राहत नव्हती. प्रत्येक महिला प्रतिनिधीचा नवरा तिचं ‘प्रतिनिधित्व’ बैठकीत करत असे. खरं हे अनपेक्षित किंवा धक्कादायक नव्हतं, सर्व काही ठरलेल्या प्रथा-परंपरांप्रमाणे चालू होते. पण मायाताईंनी हे खपवून घेतले नाही. त्यांनी याविरोधात आवाज उठवतांना ‘आपण या प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करू’ अशी भूमिका घेतली. त्याचाही परिणाम दिसून आला. अपेक्षेप्रमाणे ग्रामपंचायतीच्या कारभारात महिलांचा सहभाग वाढला. अनेक लोकोपयोगी आणि विधायक कामे त्यांनी आपल्या सरपंचपदाच्या काळात पार पाडली. व्यसनमुक्तीसाठी गावात ‘दारूबंदीचा जाहीरनामा’ काढला. शासनाच्या कल्याणकारी योजना योग्य लाभार्थींपर्यंत कशा पोहचतील आणि विकासाची गंगा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कशी पोहचवता येईल यासाठी कसोशीने प्रयत्न केले. असे अनेक छोटे-मोठे प्रयोग त्यांनी चाकूर तालुक्यातील २०/२५ गावांमध्ये केले. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. या सर्व कामांची दखल संयुक्त राष्ट्र संघाने घेतली. न्यूयॉर्क येथे भरलेल्या ५० व्या पंचायतराज विषयक संमेलनात त्यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या परिसंवादात ‘भारतीय स्त्रियांचा राजकीय सहभाग’ या विषयावर अनुभवाधारित मनोगत त्यांनी मांडले. त्यालाही द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. ही अशी प्रगतीची कमान चढती असतांना हे सगळं करत असतांना या कामामुळे ज्यांचे हितसंबंध धोक्यात आले अशा लोकांनी त्यांना बराच त्रास दिला. त्याचा मायाताईनी कामावर बिलकुल विपरीत परिणाम होऊ दिला नाही. उलट कामाचा विस्तार वाढवतांना महिला अत्याचाराच्या अनेक प्रसंगांना वाचा फोडली, शक्य तिथे समेट घडवून आणले. अनेक जोडप्यांच्या मोडणाऱ्या संसाराची घडी पुन्हा बसवली. हा सर्व भूतकाळ आठवताना मायाताई सांगतात की, “महिला म्हणून लढतांना स्वतःला अनेकार्थाने सिद्ध करावं लागतं, प्रत्येक ठिकाणी संघर्षाला पर्यायच नाही. स्त्री कडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बरेचदा ‘फक्त उपभोग्य वस्तू’ असा असतो. स्त्रीच्या अस्तित्वाला तिच्या देहापुरतंच पाहण्याची एक विचित्र मानसिकता अजूनही आहे. हे कटू असलं तरी सत्य आहे. स्त्रीला माणूस म्हणून स्वीकारण्याच्या प्रवासात समाजाला अजून मोठा टप्पा गाठायचाय, हीच आम्हा स्त्रियांची व्यथा आहे.” मायाताईंना पुढे अजूनही बरेच मुक्काम, नवी वळणं खुणावताहेत. पण तूर्तास तरी बाईजातीच्या वाट्याचे न संपणारे प्रश्न हीच आपली प्रेरणा मानत आपला लढा त्या लढताहेत. लेखक - अजित बायसमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय स्त्रोत - महान्युज