अश्विनी व शाम घोडेस्वार यांचे स्तुत्य पाऊल

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. अनेक आशा – आकांक्षासह नवरदेव, नवरी हे लग्नमंडपात येत असतात. स्वत:च्या सुखी संसारासह उज्ज्वल भविष्याची स्वप्न ती रंगवत असतात. मात्र काही तरूण मंडळी केवळ स्वत:पुरता विचार न करता सामाजिक भल्यासाठी काही पाऊल उचलत असतात. आणि त्यांचे नवे विचार सगळ्यांना वेगळीच प्रेरणा देऊन जातात. अशीच प्रेरणा वाशिम येथील दाम्पत्याने दिली आहे.

लग्नात भेट म्हणून मिळालेली रोख रक्कम ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाला देऊन अश्विनी व शाम घोडेस्वार या नवदाम्पत्याने स्तूत्य पाऊल उचलले आहे. अश्विनी ही मंगरूळपीर (जि. वाशिम) येथील अशोक नगरमध्ये राहणारे रुख्मिणी व सीताराम जमनूक यांची कन्या. तिचा विवाह कारंजा लाड येथील उषा व रामेश्वर घोडेस्वार यांचे पुत्र शाम सोबत दि. १४ मे रोजी मंगरूळपीर येथे झाला. या वधू-वरांनी लग्नात भेट मिळणारी रोख रक्कम ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान’ला मदत म्हणून देण्याचा निश्चय केला. त्यानुसार या नवदाम्पत्याने भेट रूपाने मिळालेल्या पाच हजार रुपयांचा धनादेश दि. २९ मे रोजी आमदार लखन मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.

यावेळी आमदार लखन मलिक यांनी या नवदाम्पत्याच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच इतरांनीही या दाम्पत्याचा आदर्श घेऊन स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही या नवदाम्पत्याला शुभेच्छा देऊन त्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान’ला दिलेल्या मदतीबद्दल त्यांचे कौतुक केले.यावेळी बोलताना अश्विनी व शाम घोडेस्वार या नवदाम्पत्याने सांगितले की, आईच्या गर्भातच मुलीची होणारी हत्या थांबली पाहिजे. याकरिता स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान’ला मदत करण्याचे आम्ही ठरविले. लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो. हा क्षण जीवनभर स्मरणात रहावा, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. त्यानुसार आम्हाला लग्नात भेट मिळालेली रक्कम या अभियानाला मदत म्हणून दिली.

लेखक: तानाजी घोलप

जिल्हा माहिती कार्यालय,वाशिम

माहिती स्रोत: महान्युज