बारशापासून बाराव्यापर्यंत मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या सुखदु:खाच्या प्रसंगी हजर राहणे राजकारणी मंडळीना अपरिहार्य असते. निवडणूकीनंतरही आपला संपर्क कायम ठेवण्यासाठी असे प्रसंग अप्रत्यक्षरित्या राजकीय मंडळींना फायदेशीर ठरत असतात. त्यामुळे नगरसेवक असो वा आमदार-खासदार अशा कौटुंबिक सोहळ्यांना हजेरी लावत असतात. कार्यकर्त्यांनाही ‘आमच्या लग्नाला आमदार आले' याचे कौतुक असते. सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा करणारे मुरबाड येथील भाजप आमदार किसन कथोरेही अंबरनाथ, कल्याण, मुरबाड या तीन तालुक्यातील परिचितांच्या लग्न सोहळ्यांना आवर्जून हजेरी लावत असतात. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांचा हा शिरस्ता कायम आहे. त्यातून लोकांचे प्रश्न कळतात, असा त्यांचा अनुभव. मुरबाड हा अतिमागास तालुका. विकास योजनांच्या अभावामुळे येथील सर्वसामान्य माणूस जगण्याच्या मुलभूत गरजांपासून वंचित राहिला. मात्र बहुतेक लोकप्रतिनिधी आपल्या विभागातील ही वस्तुस्थिती स्वीकारीत नाहीत. मात्र आमदार कथोरे मोकळेपणाने हे मान्य करतात.

सरकारी योजनांच्या पलिकडे जात श्री कथोरे काही उपक्रमही राबवितात. त्यातूनच दोन वर्षांपूर्वी त्यांनी संपूर्ण मतदार संघातील महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिन तपासण्याची मोहीम राबवली. त्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाबरोबरच त्यांनी कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली. गावोगावी शिबिरे भरवून महिलांची तपासणी करून घेतली. त्याचे निष्कर्ष धक्कादायक होते. नेहमीच कुटुंबाच्या हिताला प्राधान्य देणारी घरातील गृहिणी स्वत:च्या आरोग्याबाबत मात्र उदासिन असल्याचे त्यातुन निष्पन्न झाले. केवळ गरीब घरातीलच नव्हे तर सधन घरातील महिलांच्या रक्तातही हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले. मग आरोग्य सेवकांकडून त्यांना नियमित औषधे आणि आहाराचे वेळापत्रक ठरवून देण्यात आले. शिबिरांदरम्यान गावोगावी फिरून आमदारांनी याबाबतीत स्थानिकांचे प्रबोधन केले. प्रसंगी त्यांनी पुरूष मंडळींचे कानही उपटले. गावोगावी लग्नानिमित्त होणारे भपकेबाज हळदी समारंभ तसेच त्यानिमित्त वाजविल्या जाणा-या डिजे संस्कृतीवर ते कायम टीका करीत असतात.

गेल्यावर्षी आपल्या राजकीय कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आमदार कथोरेंनी अशीच एक नाविन्यपूर्ण योजना जाहीर केली. १९ सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस. त्यादिवशी मतदार संघातील विधवा महिलांचे आपण सपत्नीक कन्यादान करणार असल्याचे त्यांनी घोषित केले. कायम लोकांमध्ये वावरणा-या कथोरेंना घरातील कर्ती व्यक्ती गेल्यावर त्या कुटुंबातील महिलेची मन:स्थिती नेमकी कशी असते याची पूर्ण कल्पना आहे. मुलीच्या जन्मापासून आई-वडिलांनी तिचे कन्यादान करण्याचे स्वप्न पाहिलेले असते. त्यासाठी आपापल्या परीने तयारीही केलेली असते. मात्र काही कारणांनी पतीचे निधन झाले, की ते स्वप्न भंगून जाते. प्रश्न फक्त पैशांचा नसतो, पती निधनाने त्या कुटुंबाची पत आणि प्रतिष्ठाही धोक्यात येते. आधीच मुलीचे लग्न म्हणजे पडती बाजू, त्यात विधवेच्या मुलीचे लग्न म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. मग अशा लग्न सोहळ्यात चक्क आमदारांनी सपत्नीक कन्यादान केले तर ? मुलीला, तिच्या आईला साडीचोळी, मुलाला भेटवस्तू आणि कन्यादानाची भांडी... त्यासाठी किती खर्च होतो, हा प्रश्न महत्त्वाचा नाही. मात्र आमदारांच्या या कन्यादानामुळे त्या नववधू मुलीचे पुढील वैवाहिक आयुष्य निर्धोक होण्यास निश्चितच मदत होते. त्याचे मोल पैशात मोजता येणारे नाही.

केवळ घोषणा करून कथोरे थांबले नाहीत. वाढदिवसानंतर लगेचच २५ सप्टेंबर रोजी कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात कल्याण, मुरबाड आणि अंबरनाथ तालुक्यातील विधवा महिलांचा मेळावा भरविण्यात आला. तब्बल १५ हजार विधवांची नोंद या मेळाव्यात झाली. त्यानंतर केलेल्या सर्वेक्षणात कल्याण, अंबरनाथ तसेच मुरबाड तालुक्यात २१ हजार विधवा महिला असल्याची माहिती पुढे आली. त्या सर्व महिलांना कन्यादानाची योजना समजावून सांगण्यात आली. ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांकडे नावे नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले. या योजनेतील पहिले लग्न वांगणी इथे झाले. येथील शहनाझ अब्दुल शेख या मुलीचे कन्यादान आमदारांनी केले. मेळाव्यानंतर अगदी काही दिवसातच हे लग्न झाले. त्यानंतर लग्नांचा हा सिलसिला सुरू झाला. मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील लग्नाचे मुहूर्त निघाले आणि आमदार कथोरेंनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत त्या प्रत्येक लग्नाच्या वेळी मांडवात उपस्थित राहून कन्यादान केले. त्यापैकी काही लग्नांमध्ये त्यांच्या पत्नी कमल उर्फ नानीही उपस्थित होत्या. एक वर्षात साधारण शंभर लग्न होतील, असा अंदाज होता. मात्र मे महिन्यातच लग्नांचे शतक पूर्ण झाले. त्यानंतरही लग्ने सुरूच राहिली. आतापर्यंत या योजनेत १२८ विवाह झाले. मुस्लिम, कुणबी, आगरी, मराठा अशा अनेक समाजातील मुलींचे कन्यादान या योजनेत झाले. वडिलांच्या पश्चात आपले लग्न कसे होणार अशा चिंतेत असणा-या मुलींच्या पाठीमागे बाप म्हणून साक्षात आमदार उभे राहिले. त्याक्षणी त्यांना झालेला आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही.

कथोरे म्हणतात, ‘एका गावात कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. तेव्हा तिथली एक मुलगी चटकन पाया पडली. मी ओळखले नाही. तर ती म्हणाली- काय आप्पा ? आपल्या मुलीला ओळखलं नाहीत ? तेव्हा आठवलं, काही महिन्यापूर्वी या मुलीचे आपणच कन्यादान केले आहे.' ‘आमदाराची लेक' म्हणून विधवेच्या मुलीची प्रतिष्ठा वाढते. संपूर्ण राज्यात कथोरेंच्या या योजनेचे कौतुक झाले. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याची दखल घेतली.

अर्थात केवळ कन्यादान करून कथोरे थांबणार नाहीत. त्यांना ही सोयरिक अशीच कायम ठेवायची आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत सव्वाशेहून अधिक कन्यादान होतील. वाढदिवसानिमित्त त्यादिवशी सकाळी आपल्या या सर्व लेकी आणि जावयांना बोलावून ते त्यांचा मानपानही करणार आहेत.

लेखक: प्रशांत मोरे, पत्रकार ९८७०३३४०२२

माहिती स्रोत: महान्युज