महाराष्ट्रातील रस्त्यांवर, रेल्वे, एसटीच्या स्थानकावर, संडासच्या टाक्यांमध्ये टाकलेल्या आणि जन्मापासूनच अंधारयात्रेत भरकटलेल्या अंध, अपंग, मतिमंद बालकांचे पालकत्व स्वीकारुन त्यांचं नंदनवन साकारलेल्या मुलामुलींच्या हातून चक्क एक वृक्षलतांचं जंगलच निर्माण करावं, हे ऐकून आपण थक्क व्हाल. परंतु पंधरा हजार झाडांचं ‘अनाथारण्य’ अमरावती जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी साकारलं आहे. सुप्रसिद्ध समाज सेवक शंकरबाबा पापळकर या अनाथांच्या नाथाने परतवाडा येथून अवघ्या सहा-सात किलोमीटरवर असलेल्या वझ्झर येथे 125 अनाथ बालकांच्या हातून ही अशक्यप्राय बाब यशस्वी करुन दाखविली आहे. आपल्या समाजसेवेने हिमालयाची ऊंची गाठलेल्या या अवलियास सॅलुट! मध्य भारतातील सातपुडा पर्वतराजी म्हटली की, घाटांचा मेळ असलेल्या मेळघाटच्या संपन्न जैवविविधतेची चर्चा होते. वाघ, अस्वल, रानकुत्रे, गवा, सांबर इ. वन्यजीव आणि जवळपास तीनशे प्रकारच्या पक्षांचा अधिवास असलेलं हे घनगर्द अरण्य. यातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्याची समृद्धता थक्क करुन टाकते. अनाघ्रात अशा वृक्षागाराची छाया मोहात पाडते. पर्वतशिखरे, नदी-नाले, दऱ्याखोऱ्याचा मनोहारी निसर्ग ‘रानभूल’ पाडतो. पर्यटकांना वेड लावते. परतवाडा सोडल्यानंतर याच सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वझ्झर नावाचं एक इवलंसं गाव आहे. गेल्या जवळपास दोन तपापासून ते अख्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील प्रसिद्धीस आलं आहे. 1990 साली सुरु झालेल्या या नंदनवनाचं नाव आहे स्व.अंबासपंत वैद्य अंध, अपंग, मतिमंद, बेवारस मुलांचा आश्रम. येथे आहेत तब्बल 125 अंध, अपंग, मतिमंद, मूकबधीर इ. बालकं. यातील काही मुलं अशी आहेत की, ज्यांना अन्न आणि माती यातील फरक समजत नाही. काही मानसिकदृष्ट्या विकलांग, काहींना शारीरिक व्याघी आहेत तर काही कायमचे अंधारयात्री आहेत. या अनाथ मुलांना मायेची पाखर घालणारा एक अवलिया. शंकरबाबा पापळकर हे या अवलीयाचं नाव. चालता बोलता चैत्यन्याचा जणू सळसळता झराच. या मुलांची ते गेल्या दोन तपापासून अहोरात्र सेवा करतात. त्यांचे आरोग्य, शिक्षण आणि एवढेच नव्हेतर वयाची 21 वर्षे झालेल्या या अंध, मुकबधीर तरुण मुलामुलींना नोकरी देऊन त्यांचे संसारही या ‘बाप’ माणसाने स्वबळावर उभे केले आहे. अशाच काही कुटूंबात सुदृढ बालकंसुद्धा जन्माला आली आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी शंकररावांच्या समाजसेवेतून फुललेल्या या नंदनवनाचा सुगंध दूरवर भारतभर दरवळला आहे. तेही जाती-धर्माला पुसटसाही स्पर्श न करतात ते हा वसा चालवतात. अलीकडे अनाथ बालकांचं हे नंदनवन मात्र आणखी एका अनोख्या गोष्टीने हिरवळू लागलं आहे. ते म्हणजे शंकरबाबांनी याच मुलांच्या मदतीने 25 एकरात साकारलेलं 15 हजार झाडांचं जंगल. गेल्या दहा-बारा वर्षापासून प्रत्येक पावसाळ्यात बाबांनी स्वत: रोपटी विकत आणून याच अनाथ बालकांच्या हाताने लावली. त्याचे याच मुलांच्या मदतीने पूर्ण वाढ होईपर्यंत संगोपन आणि संरक्षण केलं. आज यातूनच जवळपास शंभर टक्के रोपट्यांची झाडं फुलाफळांवर आली आहेत. असंख्य प्रकारचे पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरं, कीडे किटकं यावर आपलं जीवनचक्र चालवतांना दिसतात. तर याच वृक्षांच्या छायेत ही अनाथ मुलं आनंदानं जीवन जगतांना दिसतात. आंतरराष्ट्रीय मानकानुसार रोपण केलेली 40 टक्के झाडे जरी वाचली तरी ते यशस्वी वृक्षारोपण मानले जाते. परंतु शंकरबाबांच्या अनाथाश्रमातील या संपूर्णपणे यशस्वी झालेल्या वृक्षारोपणातून साकारलेलं अनाथारण्य या आंतरराष्ट्रीय मानकाला लाजवेल असेच आहे. तेही सातपुडा पर्वताच्या डोंगररानात. कोणत्या वर्षी कोणकोणती झाडे लावली व आता त्यांची स्थिती काय आहे हे शंकरराव स्वत: मोठ्या उत्साहाने दाखवतात. या कार्यात सुरुवातीला असंख्य अडचणीही आल्या पाणी हे सर्वात महत्वाची बाब होती. ट्यूबवेलचा खर्च न पेलणारा होता म्हणून बाबांनी टेकड्यांवर पावसाळ्यात पडणारे पाणी योग्य रितीने जिरवून हा प्रश्न सोडवला. आता तर पाईपने, प्लॅस्टिकच्या डबक्यांनी आवश्यक तेथे पाणी टाकण्यात येते. शंकररावांच्या 125 अंध, अपंग मुलांच्या अनोख्या परिवारासाठी हेच अरण्य आता जगण्याचे साधन बनले आहे. कारण या वझ्झरच्या जंगलात आहेत कडुनिंब, साग, आवळा, सिताफळ, चिक्कू, करवंद, लिंबू, तेंदू, रक्तचंदन, लवंग, विलायची, इ. फळं देणारी झाडं. सोबतच अनेक वनौषधीयुक्त झाडांची फुले-फळे विकून अनाथाश्रमाच्या उदरनिर्वाहाकरिता उपयोगी ठरत आहे. यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे गेल्या जवळपास पाच वर्षापूर्वी बाबांनी विशिष्ट प्रकारच्या गोंदाचे उत्पादन देणाऱ्या कढई प्रजातीची शकडो झाडे लावली आहेत. या झाडांचा गोंद बाजारात दहा हजार रुपये किलोने विकला जातो. गर्भवती महिलांच्या सुदृढ आरोग्याकरिता हा गोंद अत्यंत उपयुक्त आहे. या वर्षीपासून ही गोंदविक्रीही येथे सुरु झाली आहे. जंगलातील लहान-मोठ्या वृक्षलतांची संपूर्ण निगा आश्रमातील हीच मुकबधीर मुलं राखतात. त्याकरिता प्रत्येक मुलाच्या नावाने झाडं वाटून देण्यात आली आहेत. पाणी टाकण्याच्या डबक्यांवरसुद्धा या अपंग, मुकबधीर बालकांची नाव टाकली असून ते स्वत:च्या नावाची डबकी उचलून ती पाण्याने भरुन झाडांना पाणी घालतात. दररोज सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीन तास असे रोज सहा तास ही बालकं येथील वृक्षलतांची निगा राखतात. ही झाडेच आपला परिवार असून तीच आपल्यावर मायेची पाखर घालतात, हे या मुलांच्या मनावर बाबांनी बिंबवलं आहे. त्यामुळे या मुलांना येथील वृक्षराजीचा आणि त्यावर किलबिलाट करणाऱ्या पाखरांचा लळा लागला आहे. ही झाडे जगली तर चार पैसे मिळून आपल्या एवढ्या मोठ्या 125 जणांच्या परिवाराचा गाडा चालेल, हे वास्तव या मुलांना कळून चुकले आहे. या कुटूंबाच्या अथक परिश्रमातून 300 प्रजातींच्या पंधरा हजार झाडाचं वझ्झरचं अरण्य पर्यावरण समतोलातही अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहे. शंकरबाबावर जीवापाड प्रेम करणारी ही मतीमंद, अंध, अपंग मुले आज स्वत: निर्माण केलेल्या अनाथारण्याच्या जंगलाच्या प्रेमात पडली आहेत. दहा-बारा वर्षापूर्वी लावलेल्या रोपांचं आज अंधारवन उभं झालं आहे. आता ते फुला-फळांवर आलं आहे. अनाथाश्रमाच्या उत्पन्नाचं एक साधनही बनलं आहे. उदरनिर्वाहाचा प्रमुख स्त्रोत मिळाला आहे. ही मुलं झाडं ही जणू आपलं गणगोतच आहे हे समजून येथील झाडांवर जीवापाड प्रेम करतात. त्यांची देखभाल करतात. आपल्या सर्वांच्या मेहनतीने वाढलेल्या जंगलाचा त्यांना जिव्हाळा वाटू लागला आहे. याच वृक्षराजीत शंकरराव आपल्या चंद्रमोळी झोपडीत राहातात. तेथे बाबांनी हयाती कबर तयार केली असून तेथे एक फलक झळकतो. त्यावर ‘माझ्या मृत्यूनंतर माझे शरीर ह्या हयाती कबरमध्ये माझ्या मतिमंद अनाथ मुलांनी दफन करावे. या कबरीवर सर्व अधिकार माझ्या अनाथ मतिमंद मुलांचा राहील.’ असे लिहिले आहे. महाराष्ट्रातील रस्त्यांवर, रेल्वे, एसटीच्या स्थानकावर संडासच्या टाक्यांमध्ये टाकलेल्या आणि जन्मापासूनच अंधारयात्रेत भरकटलेल्या अंध, अपंग, मतिमंद बालकांचे पालकत्व स्वीकारुन त्यांचं नंदनवन साकारलेल्या मुलामुलींच्या हातून चक्क एक वृक्षलतांचं जंगलच निर्माण करावं, हे प्रत्यक्ष पाहून आपण थक्क होतो. पंधरा हजार झाडांचं ‘अनाथारण्य’ अमरावती जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या सातपुडा पर्वताच्या डोंगरकुशीत साकारलं आहे. सुप्रसिद्ध समाज सेवक शंकरबाबा पापळकर या अनाथांच्या नाथाने परतवाडा येथून अवघ्या सहा-सात किलोमीटरवर असलेल्या वझ्झर येथे 125 अनाथ बालकांच्या हातून ही अशक्यप्राय बाब यशस्वी करुन दाखविली आहे. आपल्या समाजसेवेने हिमालयाची ऊंची गाठलेल्या या अवलियास आणि त्यांच्या मुलांना मनापासून सॅलुट! आणि त्यांच्या कार्यास सॅलूट! अनाथ वृक्ष रंगी रंगले ! प्र.सु. हिरुरकर, अमरावती. स्त्रोत - महान्युज