ग्रामपंचायत स्थापनेपासून निवडणूक नाही, गावातील पाण्याचा प्रश्नही लोकसहभागातून सोडविण्यासोबत स्वच्छता अभियानाचा पुरस्कारही आपल्या नावे करीत आदर्शवादी गावाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या गावांमध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील बिजोरा चा अग्रक्रम लागतो. विशेष म्हणजे पैसा आणि वेळेची बचत व्हावी याकरीता गावात एकाचवेळी दहा ते पंधरा जोडप्यांचे विवाह लावले जातात गावाचा अनोखा आदर्श तालुक्यातील बिजोरा हे 95 टक्के आदिवासीवस्ती असलेले गाव. बिजोरा ग्रामपंचायतीची स्थापना 1972 साली झाली. स्थापनेपासून आजवर या गावात कधी निवडणूकच झाली नाही. सरपंच, उपसरपंच आणि साऱ्या ग्रामपंचायत सदस्यांची निवड या ठिकाणी एकमतानेच होते. गावाची लोकसंख्या 1300 असून मतदारांची संख्या 850 च्या घरात आहे. बिजोऱ्यात होत नाहीत निवडणुका निवडणुका म्हटल्या की तंटे वाढतात. त्यामुळे निवडणूक न घेता एकमताने ग्रामपंचायत सदस्य निवडीचा आगळावेगळा पॅटर्न बिजोरा गावाने 1972 पासून राबविला आहे. ज्यांना निवडणुकीत उभे राहायचे आहे, त्यांनी सांगावे. लोकसंख्या कमी असल्याने प्रत्येक कुटूंबातील इच्छुकाला ग्रामपंचायतमध्ये सदस्यत्वाच्या माध्यमातून कामाची संधी दिली जाते. गावातील एका झाडाच्या खालीच सदस्य निवडीची सामूहिक प्रक्रिया पार पाडली जात असल्याने निवडणुकीच्या कारणामुळे उद्भवणाऱ्या तंट्यावर या गावाने प्रभावीपणे मात केली आहे. पाणी प्रश्न सोडविला लोकसहभागातून सामूहिक निर्णय प्रक्रीयेतून ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी पुढाकार घेणाऱ्या या गावाने पाणी प्रश्नही लोकसहभागातून सोडविला. या परिसरात मागील काही वर्षात पर्जन्यमान कमी झाले होते. त्याच्या परिणामी सन 2015-16 या वर्षात गावात पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण झाले. गावावर आलेल्या या संकटावर सामूहिकपणे मात करण्याचा निर्णय झाला. ग्रामपंचायत प्रशासनाकडून नागरीकांना लोकवर्गणी देण्याचे आवाहन करण्यात आले. प्रशासनाच्या हाकेला ग्रामस्थांची देखील सकारात्मक ओ मिळाली आणि अल्पावधीतच एक लाख रुपयाचा निधी गोळा झाला. त्या निधीतून फुलाजीबाबा संस्थान जवळ बोअरवेल खोदण्यात आली. या पर्यायातून गावाने पाणीटंचाईवर मात करण्यात यश मिळविले. इच्छा तिथे मार्ग असतोच हे आपल्या कृतीशीलतेतून या गावाने सिध्द केले. पांदण रस्ते झाले मोकळे सर्व समस्यांचे समाधान लोकसहभाग, असा विचार रुजविणाऱ्या बिजोरा गावाने पांदण रस्त्याची समस्या देखील चुटकीसरशी सोडविली. पांदन रस्त्याकरीता लोकवर्गणीच्या माध्यमातून 70 हजार रुपयांचा निधी गोळा झाला. या पैशाचा विनीयोग करीत शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले. पांदणरस्त्यावर असलेले अतिक्रमण काहींनी उत्स्फुर्तपणे काढून टाकत आपले योगदान या उपक्रमात दिले. पांदणरस्ते मोकळे झाल्याने शेतमालाची वाहतूक सुलभ होण्यास मदत झाली आहे, असे सरपंच प्रभाकर राजणे यांनी सांगितले. सामूहिक विवाह सोहळ्यांचा आदर्श राज्यातील सर्व गावांना हेवा वाटावा आणि अनुकरणीय असा सामूहिक विवाह सोहळ्यांचा उपक्रम गावाने राबविला आहे. गावातील युवक युवतीचे लग्न जुळल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्राममंडळाचे पदाधिकारी त्या कुटूंबियांची भेट घेतात. त्यांना सामूहिक विवाह सोहळ्यातच विवाह करण्याचा आग्रह धरतात. अशाप्रकारे दहा ते पंधरा दाम्पत्यांचा सहभाग झाल्यानंतर एकाचवेळी सामूहिक विवाह सोहळा होतो. जातीपातीची बंधनं याप्रकारच्या उपक्रमात झुगारली जात असल्याने सामाजिक एकोपाही जपला जातो. आजवरच्या इतिहासात या महत्वाकांक्षी उपक्रमात कधीच खंड पडला असे झाले नाही; त्यासोबतच कोणी याच्या विरोधात गेल्याचेही उदाहरण नसल्याचे सरपंच प्रभाकर राजणे सांगतात. नवरात्र उत्सवात एक गाव एक देवी राहते. सर्व महिला दररोज सकाळ, सायंकाळच्या आरती करीता एकत्र जमतात. यंदाच्या नवरात्र उत्सवात व्यसनमुक्ती, मुलीच्या जन्माचे स्वागत, स्वच्छ भारत अभियान यासारख्या देखाव्याच्या माध्यमातून संदेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे शासन निर्देशानुसार आमचे गाव आमचा विकास योजनेअंतर्गत येत्या काळात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पही गावात राबविण्याचे ठरले आहे. त्याकरीता चार वर्षात करावयाच्या कामाचा आराखडा ग्रामपंचायत प्रशासनाने तयार केला आहे, अशी माहिती प्रभाकर राजणे यांनी दिली. खरे काम निष्काम ही ग्रामसेवाझटू सर्व भावे करु स्वर्ग गावा... राष्ट्रसंताच्या विचारातील अशाच गावाची पायाभरणी करण्याकडे बिजोराची वाटचाल सुरु आहे हे निश्चीत प्रभाकर राजने सरपंच, बिजोरा, जि. यवतमाळ शब्दांकन : चैताली बाळू नानोटे निंभारा, पो. महान, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला स्रोत - महान्यूज