2014 साली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रम जाहीर केला. याला अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची हाक देत मार्च 2018 पर्यंत महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला. त्यांच्या या आवाहनाला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने उत्स्फुर्त प्रतिसाद देत जोमाने स्वच्छतेची मोहीम हाती घेतली व संपूर्ण राज्यात हागणदारीमुक्तीची मोठी चळवळ उभी राहिली. 2 ऑक्टोबर 2014 पासून आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 39 लाख 4 हजार 250 वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे 2016-17 या एका वर्षात महाराष्ट्रात तब्बल 19 लाख 17 हजार 670 शौचालयांची उभारणी झाली असून देशात ही संख्या सर्वाधिक आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची ही कामगिरी बघता महाराष्ट्र 2018 पर्यंत नक्कीच हागणदारीमुक्त होऊन देशात गौरविला जाईल असे चित्र आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे ऐतिहासिक कार्य

‘गावागावात पसरेल स्वच्छतेचे वलय, घराघरात असेल शौचालय’ यानुसार पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ग्रामीण भागात कामाला सुरूवात केली. उघड्यावर शौचास बसण्याचे धोके, शौचालयांची गरज, आरोग्याचा प्रश्न या सर्व बाबींबद्दल प्रत्येक कुटुंबाचे प्रबोधन व्हावे यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पुढाकाराने ‘कुटुंबस्तर संवाद अभियान’ राबविण्यात आले. या अभियानातंर्गत लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 18 लक्ष कुटंबियांना भेटी देऊन शौचालयाचे महत्व पटवून दिले.

मोठ्या पदस्थ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून प्रबोधन केले. त्यात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांनी शौचालयाच्या खड्ड्यातून सोनखत काढले. यासह नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन व्ही. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्वत: खड्डा खोदून श्रमदान केले. त्यांचे हे कार्य ग्रामस्थांना प्रोत्साहित करणारे ठरले. जिल्हा परिषदांतर्फे कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन, जनजागृती केली. हागणदारीमुक्तीच्या चळवळीत लोकसहभाग हा सर्वाधिक महत्त्वाचा होता. हे ओळखून या मोहिमेत लोकसहभाग वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले.

तालुक्यातील सर्व कर्मचारी संघटना, सामाजिक संघटना यांचा सहभाग स्थानिक कर्मचाऱ्यांचे आपआपल्या गावात सहकार्य, प्रबोधनासाठी मनोरंजक पथनाट्ये, विविध उपक्रमांचे आयोजन, फ्री विथ सिईओ, टी विथ व्हिडिओ, यशस्वी ग्रामपंचायतींचे अभिनंदन फलक, स्वच्छता रथ, सायकल रॅली, एक दिवस गावासाठी हे उपक्रम हागणदारीमुक्त अभियानात मोलाची भूमिका बजावत आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने केलेल्या नियोजनातून एका वर्षात 19 लाख 17 हजार 670 शौचालय बांधण्याचे ऐतिहासिक कार्य महाराष्ट्रात झाले आहे, जे हागणदारीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी अत्यंत पोषक आहे.

महाराष्ट्राची सद्य:स्थिती

सिंधुदुर्ग, वर्धा, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, ठाणे, भंडारा, पुणे, नागपूर, गोंदिया असे 11 जिल्हे पूर्णत: हागणदारीमुक्त झाले आहेत. गेल्या तीन वर्षात वैयक्तिक शौचालयांची व्याप्ती 35 टक्क्यांनी वाढली आहे. राज्यातील 149 तालुके, 16 हजार 581 ग्रामपंचायती व 23 हजार 844 गावे हागणदारीमुक्त घोषित करण्यात आली आहेत. देशात हा आकडा सर्वाधिक असून हागणदारीमुक्त घोषित झालेल्या देशातील ग्रामपंचायंतीपैकी 18 टक्के ग्रामपंचायती या महाराष्ट्र राज्यातील आहे. राज्याने हागणदारीमुक्तीकडे जोमाने वाटचाल सुरू केली आहे.

दरवाजा बंद माध्यम अभियानाच्या शुभारंभाचा मान

हागणदारीमुक्तीत सध्या महाराष्ट्र देशभरात आघाडीवर आहे. त्या पार्श्वभूमिवर केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या दरवाजा बंद माध्यम अभियानाच्या शुभारंभाचा मान केंद्र सरकारने महाराष्ट्राला देऊन नुकताच केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर, महानायक अमिताभ बच्चन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत मोठा सोहळा पार पडला. अभियानाच्या शुभारंभासह हागणदारीमुक्त झालेल्या 11 जिल्ह्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. महाराष्ट्राचे हागणदारीमुक्तीतले कार्य कौतुकास्पद असून मान्यवरांनी गौरव केला. मोठ्या प्रमाणात झालेली कामे पाहून महानायक अमिताभ बच्चन, केंद्रीय मंत्री श्री.तोमर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांचे अभिनंदन केले. 2018 पर्यंत महाराष्ट्र हागणदारीमुक्त होईलच, असा विश्वास मंत्री श्री.लोणीकर यांनी व्यक्त केला असून आपण या मोहिमेत सहभाग दर्शविल्यास स्वच्छ, सुंदर, आरोग्य संपन्न महाराष्ट्राचे सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल.

- आनंद सुरवाडे

माहिती स्रोत: महान्युज