तलम वस्त्र म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते रेशीम... रेशीम भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. याचे दाखलेच द्यायचे झाले तर अगदी सातवाहन काळापर्यंत मागे जाता येते. भारतातून ग्रीक आणि रोमन या सभ्यतेला आपल्या कडून हे अतिउच्च प्रतिचे वस्त्र पुरविले जायचे. सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान नगरीतून पैठणीची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याचा उल्लेख आहे. तसेच कोसल्याचेही काम कापड विनकामासाठी व्हायचे त्यामुळे रेशमाला अनन्य साधारण महत्व सुरुवातीपासूनच होते. औद्योगिक क्रांतीनंतर कापड निर्मितीत मोठी क्रांती झाली मानवी बळावर करायची कामे अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने होऊ लागली. कमी मनुष्यबळात भरपूर काम होऊ लागल्यामुळे या व्यवसायाचे सूत्र बदलले. वाई आणि परिसरात जुन्या काळापासून रेशीम काढण्याचे काम होत असे... आता राज्य शासनाने वाईत रेशीम पार्क तयार केला आहे. त्या पार्कचा लेखाजोखा पाहूया या लेखात.

जिल्हा रेशीम कार्यालयाची स्थापना रेशीम संशोधन केंद्र म्हणून वाई येथे सन 1958 रोजी करण्यात आली. सन 1980 सालापर्यंत वाई हे महाराष्ट्रातील रेशीम उद्योगाचे मुख्यालय होते. रेशीम उद्योगाचा प्रचार व प्रसार व्हावा हा मुख्य उद्देश ठेऊन स्थापन केलेल्या उद्योगामध्ये रेशीम उद्योगामधील वेगवेगळ्या रेशीम किटकांच्या जाती, तुतीच्या जाती यावर संशोधनही झाले. महाराष्ट्र हे रेशीम उद्योगासाठी अपारंपारीक राज्य असल्याने केंद्रीय रेशीम मंडळाच्या सहाय्याने येथे रेशीम उद्योगाच्या विस्तारासाठी प्रशिक्षण पथदर्शक फार्म, रिलींग केंद्र, कापड विक्री, शेतकरी - विद्यार्थी प्रशिक्षण व देशविदेशातील पर्यटक भेटी अशा विविध पातळीवरील कार्यरत असणारे महाराष्ट्रातील केंद्र सिल्क व्हॅली म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या दशकापासून जिल्ह्यातील या केंद्रावर मोठ्या प्रमाणात रेशीम क्रांती झालेली आहे. रेशीम शेतकऱ्यांनी या उद्योगाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या जिल्ह्यात 311 रेशीम उद्योजक शेतकरी 319 एकर क्षेत्रावर मानकानुसार रेशीम कोषांचे उत्पादन घेत आहेत. त्यांना सुधारीत तुतीच्या जाती व कोषांच्या जातींचा अंडीपुंज पुरवठा जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत केला जातो. हे केंद्र अजूनही जुन्या वास्तू व साधनसामुग्रीवर चालू आहे.

वाई हे ठिकाण कृष्णातीरी ऐतिहासिक व प्रेक्षणिय स्थळ असून पाचगणी महाबळेश्वर या पर्यटन स्थळापासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे. पर्यटनदृष्ट्या वाई हे महागणपतीसाठी प्रसिद्ध आहे. अशा ठिकाणी असणाऱ्या ऐतिहासीक रेशीम उद्योग केंद्राची सुरुवात ज्या परिसरातून झाली त्या वास्तुचे नुतनीकरण करण्यात आले आहे. या रेशीम केंद्रावर दरवर्षी सर्वसाधारण 10 ते 15 हजार पर्यटक, विद्यार्थी, शैक्षणिक सहली, विदेशी पर्यटक आवर्जुन भेट देतात. रेशीम उद्योगाची माहिती घेतात व कुतुहलाने कापड व संपूर्ण रेशीम प्रक्रियेची माहिती मागतात जी सर्वतोपरी दिली जाते.

जिल्हा रेशीम कार्यालय, वाई जि.सातारा येथील म्युझीयम/चलचित्रगृहामध्ये लहान अळी संगोपानापासून ते रेशीम कापड तयार करणे पर्यंत संपूर्ण यंत्रणा उभी करण्याचे काम चालू आहे. सदर काम हे तीन टप्यांणयमध्ये करण्याचे नियोजित आहे. प्रथम टप्यार्मध्ये चलचित्रगृह तयार करण्यात आले आहे. यामध्ये रेशीम कार्यालय, वाई येथील उपलब्ध जागेतील प्रोजेक्टर लावून रेशीम उद्योगासंदर्भात परिपूर्ण माहिती दाखविण्यात येते सदर चलचित्रगृहाची क्षमता 50 प्रेक्षकांची आहे. सदर चलचित्रगृहासाठी संचालानालयामार्फत रेशीम उद्योगासंदर्भात माहितीपट दाखविण्यात येत आहे. रेशीम उद्योग हा महाराष्ट्रामध्ये अपारंपारीक उद्योग असल्याने बहूतांश जनतेला त्या संबंधीची परिपूर्ण व शास्त्रोक्त माहिती नसल्याकारणाने हा माहितीपट त्यांना एकपथदर्शक प्रयोग ठरत आहे. हा माहिती पट 20 मिनिटांचा असून त्यामध्ये अंडीपुंज निर्मिती ते रेशीम कापड तयार करण्यापर्यंत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. सदर चलचित्रगृह हे जुन्या उपलब्ध असलेल्या इमारतीचे नुतनीकरण करुन उभारले आहे. त्यामध्ये 50 खुर्च्यांची खरेदी करुन बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच माहितीपट दाखविण्यासाठी प्राजेक्टर, साऊंड सिस्टीम, डीव्हीडी प्लेअर इत्यादी अनुषंगीक सामुग्री खरेदी केली आहे. हे चलचित्रगृह शेतकरी चर्चासत्र व प्रशिक्षणासाठीही उपयुक्त ठरत आहे.

वाई रेशीम पथदर्शक फार्मवर उपलब्ध असलेल्या जुन्या 3500 स्के.फुट इमारतीचे नुतनीकरण करुन संग्रालय निर्मिती केली आहे. निसर्गातील चारही प्रकारचे रेशीम म्हणजेच 1) तुती रेशीम 2) टसर रेशीम 3) एरी रेशीम 4) मुगा रेशीम या जातींचे कोष कापड प्रक्रिया दुर्मिळ मशिनरी, पुस्तके माहितीपत्रक, भिंत्तीचित्रे व कापड इत्यादी प्रकारचे दालन तयार करुन संग्रहीत करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे रेशीम शेतकरी, उद्योजक, पर्यटक व विद्यार्थी यांना रेशीम उद्योगाची संपूर्ण माहीती याद्वारे देण्यात येईल.

सदर म्युझीयममध्ये कोष खरेदी प्रक्रिया कोष शिजविणेची प्रक्रिया उपलब्ध असलेल्या कॉटेज बेसीन मशिनवर धागा तयार करणे, रि-रिलींग करणे, लडी तयार करणे, ट्विस्टींग करणे व हातमागावर कापड तयार करणे इत्यादी प्रात्यक्षिके उभी करण्यात येत आहेत. त्याचबरोबर टसर कोषापासून धागा निर्मितीचे मशीनसुद्धा उभारण्यात आले आहे.

वाई येथील पथदर्शक फार्म, म्युझीयम व चलचित्रगृहाला भेट दणाऱ्या पर्यटकांसाठी रेशीम चिंता-मंथा कुटीची उभारणी उपलब्ध असलेल्या जागेत नुतनीकरण करण्यात आली आहे. सदर कुटीमध्ये येणाऱ्या पर्यटकांची बैठकीची व जेवण अल्पोपहार बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाई येथील पथदर्शक फार्म हा नैसर्गिक साधन सामुग्रीने संपन्न आहे. फार्मवर वड, पिंपळ, लिंब, निलमोहर, गुलमोहर, आंबा, जांभुळ व फुलझाडे अशी विविध प्रकारची वृक्ष संपदा असुन यामध्ये विविध जातीचे पक्षी प्रामुख्याने मोरांचे वास्तव्य आहे. सदर झाडावर मचान व कुटी उभारण्याचे नियोजन केलेले आहे. ज्यामुळे पर्यटकांना निसर्गाची जवळून अनुभूती घेता येईल.

त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स पार्क उभारण्याचे नियोजन केले आहे. कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या पथदर्शक फार्मवर सिंचन विहीर, ठिबक सिंचन, रेशीम किटक संगोपनगृह, तुती रोप वाटीका, रेशीम तुती लागवड अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

फार्मवर तुती रोपांच्या ट्री व्हरायटीज तयार करण्यात आल्या आहेत. भंडारा येथून रोपे मागवून अर्जुन, एैन या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. अर्जुन व एैन टसर रेशीम प्रजातीसाठी खाद्यान्न वृक्ष आहेत. एरी जातीच्या प्रजातीसाठी स्थानिक पातळीवरुन एरंडी बियाणे लावून एरंडीची झाडे तयार करण्यात आली आहेत. सदर झाडांच्या लागवडीमुळे रेशीम किटकांच्या चारही प्रमुख प्रजातीचे संगोपन वाई येथील रेशीम पथदर्शक फार्म करण्याचे नियोजिले आहे. ज्यामुळे पर्यटकांना शेतकऱ्यांना व विशेषत: विद्यार्थ्यांना रेशमाच्या प्रमुख चारही जातींचे संगोपन एकाच ठिकांणी पाहाता येईल. येथे रेशीम उद्योगावर आधारीत प्रकाशने सर्वसामान्य वाचकांसाठी काही संबंधित पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत.

दुसऱ्या टप्या दमध्ये, रेशीम उद्योगाची सुरुवात ज्या ऐतिहासिक ठिकाणा पासून झाली त्या जिल्हा रेशीम कार्यालय, वाई जि.सातारा येथे वाई-1, वाई-4, वाई-7 या रेशीम किटकांच्या प्रजाती विकसीत करण्यात आल्या त्या वाईचे हवामान हे तांत्रिक व वैज्ञानिक कारणास्तव प्रयोगासाठी (Research & Development) योग्य असून सध्याच्या काळात महाराष्ट्रामध्ये एकही संशोधन तथा विकास प्रयोगशाळा नसल्याने अशा प्रकारच्या (Research & Development) लॅबची सुरुवात करण्याचे नियोजन आहे. यामध्ये माती परिक्षण, पाणी परिक्षण, तुतीच्या नवीन प्रजाती व किटकांवर प्रयोग करण्यात येऊन महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीनूसार सुधारीत खतांच्या मात्रा, तुतीच्या जाती विकसीत करण्यात येऊन त्यांच्या शिफारशी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग, संशोधन तथा विकास प्रयोगशाळा (Research & Development) चलचित्रगृह व संग्रहालय याची गरज या जिल्हा रेशीम कार्यालयास आहे. रेशीम केंद्रावर दरवर्षी सर्वसाधारणपणे 200 शेतकऱ्यांचे तुती लागवड व किटक संगोपनचे प्रशिक्षण आयोजित केले जाते. त्यामध्ये तुती लागवडीपासून ते कोष विक्रीपर्यंतचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात येते.

लेखक: युवराज पाटील

माहिती स्रोत: महान्युज