शेख शरीफ अहमद, रा. शिवाजी नगर, जळगाव. शिक्षण बारावी. व्यावसायिक स्पर्धेच्या जगात इतक्या शिक्षणावर नोकरी मिळणं तसं दुरापास्त. पण संसारचा गाडा ओढायचा तर आहे आणि त्यासाठी काहीतरी उत्पन्नाचं साधन असावं म्हणून नोकरीचा मार्ग सोडून स्वतःच्या तुटपूंज्या भांडवलावर ‘एस.एस.जनरल स्टोअर्स ॲण्ड कोल्ड्रिंक्स’ हे लहानसं दुकान थाटलं. किराणा माल, दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या किरकोळ वस्तू त्यांनी विक्रीसाठी ठेवल्या. ही झाली सुमारे पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. घरात आई, पत्नी, तीन मुली असा परिवार. वयाने वाढणाऱ्या मुलाबाळांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पन्न वाढवणं आवश्यक होतं. त्यासाठी स्वतःचा व्यवसाय वाढवणं हा एक पर्याय होता आणि त्यासाठी आवश्यकता होती ती पूरक भांडवलाची. शिवाय व्यवसायाला आधुनिक स्वरुप देणेही आवश्यक होते. तशातच समोर आलेला दिवाळी सारखा सण, नेमके याच काळात वाढणारी किराणा माल आणि सौंदर्यप्रसाधनांची मागणी. कोणत्याही व्यवसायातील अडचणीचा काळ हाच कसोटीचा क्षण असतो. याच कसोटीवर शरीफभाई आपला कस लावणार होते. याच सुमारास त्यांना मुद्रा बॅंकेच्या योजनेची माहिती मिळाली आणि त्यांनी सेंट्रल बॅंकेच्या शिवाजीनगर शाखेचा दरवाजा ठोठावला. बॅंकेच्या अधिकाऱ्यांना आपलाच खातेदार असलेल्या शरीफभाईंच्या सचोटीच्या व्यवहाराची पूर्वकल्पना असल्याने त्यांनी तात्काळ त्यांचे मुद्रा बॅंक कर्ज प्रकरण मंजूर केले आणि 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य भांडवल घेऊन शरीफ भाईंनी आपल्या दुकानात जादा गुंतवणूक केली. याचा परिणाम सकारात्मक झाला आणि ऐन सणासुदीच्या काळात निर्माण झालेली व्यवसाय वृद्धी त्यांना साधता आली. या व्यवसाय वृद्धीमुळे त्यांच्या व्यवसायात निव्वळ नफ्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. या कर्जाचा मासिक दीड हजार रुपयांचा हप्ता वजा जाता आता महिन्याकाठी 10 ते 15 हजार रुपयांची कमाई होऊ लागली आहे. आता शरीफभाई आपला वाढलेला व्यवसाय आणि वाढलेली कमाई पाहून कमालीचे संतूष्ट आहेत. त्यांच्या व्यवसायाला मिळालेल्या या चालनेमुळे आता त्यांना त्याचे सुपरशॉप टाकण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे वेध लागले आहेत. लेखक - वसंत कुलकर्णी, जळगाव. रोत - महान्युज