14 बंदीजनांना मिळणार कर्जमाफी योजनेचा लाभ

मध्यवर्ती कारागृहात जिल्हा प्रशासनातर्फे विशेष सुविधा

जेल प्रशासनाच्या मान्यतेमुळे कर्जमाफीचे अर्ज

मध्यवर्ती कारागृहातील शेतकरी असलेल्या बंदीजनांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी केलेल्या विनंतीनुसार जेल प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेवून सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तसेच जिल्हा प्रशासनाने 14 बंदीजनांचे कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरुन घेतले आहेत. त्यामुळे शासनाच्या महत्वाकांक्षी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग बंदीजनांनाही सुलभ झाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय शासनाने घेतला असून या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांच्याकडे अर्ज केला होता. बंदीजनांच्या विनंतीनुसार सामाजिक कार्यकर्ता गजानन इंगळे यांच्या सहाय्याने कर्जमाफीसाठी विनंती केलेल्या बंदीजनांकडून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेल्या आधारकार्डासह इतर माहिती त्यांच्या नातेवाईकाकडून गोळा करण्यात आली.

कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी मध्यवर्ती कारागृहातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील बंदीजनांनी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीनुसार सामाजिक कार्यकर्ते गजानन इंगळे यांनी आधारकार्ड, तसेच इतर कागदपत्र गोळा करण्यासाठी बंदीजन व त्यांच्या नातेवाईकांकडे कारागृहाच्यावतीने संपर्क केला. त्यापैकी आधारकार्डावरील बायोमेट्रीक नोंदणीनुसार पुष्टी करताना विसंगती तसेच काही बंदीजनांकडे आवश्यक दस्ताऐवज उपलब्ध झाले नाहीत. त्यापैकी 14 बंदीजनांचे आधार क्रमांकासह ऑनलाईन नोंदणीसाठी पात्रता योग्य असल्यामुळे त्यांची नोंदणी करण्यात आली.

शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कृषी कर्जमाफीसाठी जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले. त्यावर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी तहसीलदार तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या चमूला मध्यवर्ती कारागृहामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक बायोमेट्रीक यंत्रासह पाठविले. या चमुने बंदीजनांकडून ऑनलाईन अर्ज भरुन घेतले. कर्जमाफीच्या नोंदणीनंतर युजर आयडी व पासवर्ड तयार झाल्यामुळे बंदीजनांच्या कुटूंबियांना आता त्यांच्या गावातील संग्राम केंद्रात अथवा आपले सरकार सेवा केंद्रात जावून ऑनलाईन फार्म भरणे सुलभ झाले आहे.

कर्जमाफी मिळण्यासाठी 15 सप्टेंबर ही शेवटची तारीख असल्यामुळे बंदीजनांच्या कुटूंबांना त्यांच्या गावातील नोंदणी केंद्रामध्ये जावून कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी सुध्दा मार्गदर्शन करण्यात आले आहे. ‘आपले सरकार’ या सेवा केंद्राचे जिल्हा समन्यक उमेश घुगुसकर, आनंद पटले यांनी ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था केली. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ता गजानन इंगळे यांनी महत्त्वपुर्ण भुमिका बजावली. मध्यवर्ती कारागृहाचे उपअधीक्षक सुनिल निघोट, वरिष्ठ तुरुंग अधिकारी श्री. गावित, श्री. मिराशे, श्री. पाटील गुरुजी, श्री. हतवादे गुरुजी यांनी विशेष सहकार्य केले. मध्यवर्ती कारागृह व जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक पुढाकाराने शेतकरी कर्जमाफी योजनेपासून शेतकरी वंचित राहणार नाही. या शासनाच्या भूमिकेनुसार बंदीजन असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळण्याचा मार्ग सूकर झाला आहे.

लेखक: अनिल गडेकर

माहिती स्रोत: महान्युज