वॉट्स देअर इन नेम...? म्हणजेच नावात काय आहे ? असा सवाल इंग्लंडमधील थोर साहित्यिक व कवी विलियम शेक्सपियर यांनी सोळाव्या शतकात विचारला होता. पण आजकाल मात्र नावातच बरेच काही दडलेले असते अशी म्हणण्याची वेळ आली आहे. जेव्हा टिंगल-टवाळकी, चेष्टा, निंदा आणि थट्टेचा विषय आपले नावच बनते, तेव्हा नावाचे महत्व कळते. आपल्या नकोशा वाटणाऱ्या नावाला कंटाळून लाखो लोक आपले नाव बदलून घेतात. यासाठी शासनाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्याने नाव बदलाच्या प्रक्रियेमुळे शासनाला करोडो रूपयांचा महसूल मिळत आहे. एकट्या औरंगाबाद विभागातून 2017 -18 या आर्थिक चालू वर्षामध्ये 4 हजार 696 लोकांनी आपल्या नावात तसेच धर्म, जन्मतारखेत बदल केला असून जवळपास 21 लाख 80 हजार 250 रूपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे, अशी माहिती शासकीय लेखनसामग्री व ग्रंथागार विभागाचे सहायक संचालक जी.ए.बचाटे यांनी दिली.

अनेक नावे तसेच आडनावांच्या मागे मोठे वलय असते, काही नावे तर शौर्य, प्रतिष्ठा, घराणेशाहीशी जोडलेली असल्याने अशा नावांची तऱ्हाच काही और असते. तर काही नावे ही ज्याची त्यालाही लाजिरवाणी वाटतात. आवडता अभिनेता, अभिनेत्री, खेळाडू, राजकीय नेता, यांच्या नावाप्रमाणे आपले नाव तसेच आडनाव बदलणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ऑनलाईन नाव बदलण्याच्या प्रक्रियेला 2014 पासून सुरूवात झाली. यामुळे गाव खेड्यात राहणाऱ्या माणसाला नावात बदल करण्यासाठी औरंगाबादला येण्याची गरज राहिली नाही. तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या महा-ई-सेवा केंद्र तसेच ग्रामपंचायतीत असलेल्या ऑनलाईन सेवेचा लाभ घेऊन एका क्लिकवर आपल्या नावात बदल करून घेता येत असल्याने लोकांच्या सोयीचे झाले आहे. त्यामुळे औरंगाबाद येथील शासकीय लेखनसामग्री व ग्रंथागार विभागात येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. अतिदुर्गम तसेच दुरवरच्या खेड्यातून नागरिकांना या ठिकाणी यावे लागत असल्याने त्यांचे अतोनात हाल होत असे. एखाद-दुसरी कागदपत्रे जवळ नसल्यास आर्थिक झळ सोसावी लागत होती. त्यामुळे सर्वसामान्य माणूस जेरीस येत होता. परंतु शासनाच्या ऑनलाईन प्रकियेमुळे लाखो नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

नावात बदल करण्याकडे तरूणांचा ओढा

नावात बदल करून घेण्यासाठी तरूणाईचा कल वाढला असून सिनेसृष्टी, नाटक, मालिका, खेळ आणि मॉडेलींग क्षेत्रात करिअर करू इच्छीणारे तरुण-तरूणी त्या क्षेत्राला साजेल असे नाव धारण करीत आहे. आपल्या नावात आईचे नाव जोडले जावे यासाठी जास्तीत जास्त जण पसंती देत आहेत. नावातूनच माणसाला स्वतंत्र ओळख मिळत असल्याने ती सर्वार्थाने परिपूर्ण असावी याकडे लोक जास्त लक्ष देऊ लागले आहेत.

का बदलतात नावे ?

अनेकांचे आडनाव हे हास्यास्पद असल्यामुळे ते नाव बदलण्यास प्राधान्य देत आहे. विविध प्रकाराच्या नावावरून किंवा आडनावांवरून लोकांना चिडविले जात असल्याने अशी नावे लोकांना नकोशी वाटतात. असे नाव सांगताना सार्वजनिक ठिकाणी अपमान वाटतो. मालमत्ता, ओळखपत्रे, जातिसूचक आडनाव, धर्मांतर, स्पेलिंग मिस्टेक, तसेच लग्न किंवा घटस्फोट अशा काही कारणामुळे नाव बदलावे लागते.

- रमेश भोसले

माहिती स्रोत: महान्युज