‘हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे । हे सूत्र ध्यानी ठेवोनि खरे।

आपुले ग्रामचि करावे गोजिरे। शहराहूनि॥’

संत तुकडोजी महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे आपले गाव ‘गोजिरे’ करण्याचा चांगला प्रयत्न नाशिक जिल्ह्यातील माळेगावच्या ग्रामस्थांनी केला आहे. सिन्नर तालुक्यातील या गावात प्रवेश करताक्षणी प्रसन्नता आणि स्वच्छता जाणवते. गावातील प्रत्येक निर्मितीमागे विकासाचा एक विचार आणि नागरिकांचा एकोपा आहे. म्हणूनच अनेक पुरस्कार प्राप्त करणाऱ्या या गावाला महाराष्ट्रदिनी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ‘स्मार्ट ग्राम’ योजनेअंतर्गत दहा लाखाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

औद्योगिक वसाहतीस लागून असलेल्या या गावाने गेल्या सात वर्षात केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. माजी सरपंच तुकाराम सांगळे आणि तत्कालीन ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांचे मार्गदर्शन तसेच गावात बदल करण्याबाबत ग्रामस्थांमध्ये असलेल्या एकवाक्यतेमुळे गावाचे रुप वेगाने पालटले आहे. सरपंच अनिल आव्हाड, त्यांचे सहकारी आणि ग्रामविकास अधिकारी कैलास वाघचौरे यांनी या प्रयत्नांना पुढे नेत गावाचा खऱ्या अर्थाने सर्वांगिण विकास घडवून आणला आहे.

गावात प्रवेश करताच सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दाट झाडांनी आपले स्वागत होते. सात हजार लोकसंख्येच्या या गावात लोकसंख्येपेक्षा जास्त पंधरा हजारावर वृक्ष आहेत. लावलेले प्रत्येक झाड जगविण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

गावात सर्वत्र स्वच्छता आढळते. काँक्रीटचे रस्ते, कडेला असलेली झाडे, बसण्यासाठी लावलेले बाक, गावाच्या सौंदर्यात भर घालतात. कचरा उचलण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली असून कचरा नियमितपणे कचराडेपोत वाहिला जातो. गाव प्लास्टिकमुक्त करण्यासाठी दुकानदारांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे. गावाची निवड यावर्षीच्या जिल्हास्तरावरील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. संपूर्ण गावात भूमीगत गटारांची कामे करण्यात येत आहेत.

गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या शाळेची प्रशस्त इमारत स्वनिधीतून बांधून दिली आहे. शाळेत ई-लर्निंग सॉफ्टवेअरद्वारे शिक्षण दिले जाते. ग्रामपंचायतीने पाच अंगणवाड्यादेखील बांधल्या आहेत. विधवा, अपंग, परितक्त्यांच्या मुलींना उच्च शिक्षणासाठी लॅपटॉप वितरण करण्यात आले आहे. शाळा आणि अंगणवाड्यांच्या ठिकाणी किशोरवयीन मुली व महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन यंत्राद्वारे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आहे.

नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत इमारतीत मिनरल वॉटर प्रकल्प उभारला आहे. येथे डिजीटल कार्डद्वारे 5 रुपयात 20 लिटर पाणी उपलब्ध करून दिले जाते. प्रकल्पातील अशुद्ध पाण्याचा उपयोग झाडांसाठी केला जातो. पाण्याची बचत होण्याच्यादृष्टीने नळ कनेक्शन देताना जलमापक यंत्र बसविण्यात आले असून त्याचे संगणकीकृत देयक देण्यात येते. त्यासाठी जीआयएस मॅपींग वॉटर बील सॉफ्टवेअर उपयोगात आणले आहे. गावातील प्रत्येक कुटुंबास पाण्यासाठी 20 लिटरचे जार आणि कचरा एकत्रित करण्यासाठी कचराकुंडीचे वितरण करण्यात आले आहे.

गावात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत घरकूल, पेव्हर ब्लॉक आणि रस्त्यांच्या व्यवस्थेबरोबरच सार्वजनिक विहिर आणि कपडे धुण्यासाठी पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. गाव हागणदारीमुक्त असून गावात वैयक्तिक शौचालयाबरोबरच 128 सार्वजनिक शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या व्हॅक्युम क्लिनर सक्शन मशीनचा वापर सेफ्टी टँक उपसण्यासाठी केला जातो. जलसंधारणाची कामे हाती घेताना लोकसहभागातून गावातील तळ्यातून दहा हजार क्युबीक मीटर गाळ काढण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसीत करण्यात आले आहे.

- ग्रामपंचायतीची सुसज्ज आणि सुंदर इमारत

- इमारतीत संगणकीकृत यंत्रणा

- इमारतीवर 360 अंशात फिरणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे गावातील घटनांवर लक्ष

- प्रवेशद्वाराजवळ विविध योजनांची माहिती देणारी एलईडी स्क्रीन

- दररोजचा जमाखर्च स्क्रीनवर प्रदर्शित

- इमारतीवर 2 किलोवॅट सोलर ग्रीड टाय सिस्टीम. इमारतीसाठी याच यंत्रणेद्वारे वीजपुरवठा. अतिरिक्त - - वीज महावितरणला दिल्याने वीज बिलात बचत.

- यंत्राद्वारे नागरिकांना कराची माहिती देण्याची सुविधा

- येणाऱ्या नागरिकांसाठी कार्यालयात स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची चांगली सुविधा

- इमारतीवर वायफाय यंत्रणा

- बायोमेट्रीक हजेरी

- गावाला पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामसह विविध पारितोषिके

- आयएसओ 9001:2008 प्रमाणपत्राचे 2018 पर्यंत नुतनीकरण

- दहा नागरिकांना बायोगॅस सयंत्राचे वाटप

- गावात 46 ठिकाणी सौरदिप

- ग्रामपंचयत हद्दीत स्थानिकांच्या घरात जन्माला येणाऱ्या दुसऱ्या मुलीच्या नावे ग्रामपंचायत निधीतून - 10 हजार रुपये मुदत ठेव ठेवण्याची योजना, आठ मुलींच्या मातांच्या नावाने मुदत ठेव.

- शेतकऱ्यांसाठी हवामान केंद्र. मोबाईलद्वारे हवामानाची माहिती

- घरपट्टी आणि पाणी पट्टी वेळेवर भरणाऱ्यांसाठी मोफत पीठ गिरणीची व्यवस्था

- ग्रामपंचायतीमार्फत गावातील स्थानिक महिलांचा पंतप्रधान सुरक्षा विमा योजना व पंतप्रधान जीवन - ज्योती विमा योजनेअंतर्गत मोफत विमा

- अभ्यासिकेची नुकतीच उभारणी

- अपंगांना व्यवसायासाठी गाळे आणि वयोवृद्धांना काठीचे वाटप

- कर्मचाऱ्यांची वसाहत आणि ग्रीन जीमची उभारणी

माळेगावने अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामांमुळे ग्रामविकासात चांगली प्रगती घडवून आणली आहे.

‘सर्वांगिण असावी ग्रामरचना । मनोरंजनासहित पुरवाव्यात भावना ।

जेणेकरून ग्रामवासीयांना । आठवण ना ये शहराचा ॥’

हे गावाने सिद्ध करून दाखविले आहे. माळेगाव खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ झाले आहे.

तुकाराम सांगळे-माळेगावचे नाव राज्यस्तरावर देण्यासाठी ग्रामस्थ एकत्रित प्रयत्न करतात. विकासाची कोणतीही नवी संकल्पना गावात राबविण्यात सगळ्यांची साथ मिळते. त्यामुळे चांगले निर्णय घेऊन गावाचा विकास वेगाने होत आहे. गावातील विकासकामांचा प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे.

- डॉ.किरण मोघे

माहिती स्रोत: महान्युज