आंध्र प्रदेशातील डोंगरांत राहणारी एक जमात. तमिळनाडू व केरळ या राज्यांतूनही यांची वस्ती आढळते. यांची लोकसंख्या ३५,४५६ (१९६१) होती. हे लोक काळे, मध्यम उंचीचे व मजबूत बांध्याचे असून यांची भाषा तेलुगू आहे. यांचा मुख्य व्यवसाय फिरती शेती हा आहे; पण नांगरणीची शेतीसुद्धा ते काही ठिकाणी करतात.

यांच्यामध्ये अनेक कुळी असून त्यांची एकमेकांत लग्ने होतात. गावपंचायतीच्या प्रमुखाला ‘पेद्दाकापू’ म्हणतात. हे प्रमुखत्व वंशपरंपरेने चालते व तो गावचा पुजारीही असतो.

त्यांच्यात अनेक ग्राम-देवता असून मुथियलम्मा ही मुख्य देवता आहे. उत्सवाच्या वेळी डुक्कर व कोंबडी यांना बळी देतात. पूर्वी माणसे बळी देण्याची प्रथा होती. त्यांचा भुताखेतांवर विश्वास नाही. मात्र ते दैवी शक्ती मानतात. वेजू हा भगत वैदू असतो.

पूर्वी मृताला पुरत, पण अलीकडे इतरांशी हळूहळू संपर्क आल्यामुळे जाळण्याची प्रथा अस्तित्वात येत आहे.

संदर्भ :Furer-Haimendorf, C.; Furer-Haimendorf, Elizabeth, TheReddis of Bison Hills, Toronto, 1946.

लेखिका : सुमति कीर्तने

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश