केरळ, तमिळनाडू व कर्नाटक राज्यांतील एक जमात. बोलीभाषेतील फरकामुळे कुरुमन (केरळ), कुरुंबा(तमिळनाडू), कुरुबा (कर्नाटक) या नावांनी संबोधिली जाते. १९६१च्या जनगणनेनुसार या तीन राज्यांत मिळून कुरुमन १३,५८७, कुरुंबा २,१७३ व कुरुबा ९,२४६ होते. कुरुंबा ऊर्फ कुरुमन हे जंगलवासी असून काडू कुरुंबा ही त्यांची पोटजात आहे. प्रामुख्याने कर्नाटकात आढळणारे कुरुबा मेंढपाळ असून त्यापैकी काहीजण घोंगड्या विणणारे आहेत. बेट्टा व जेनू या कुरुंबांच्या दोन पोटजाती आहेत. बेट्टा लाकूडतोडे व जेनू मध गोळा करणारे आहेत.

या जमातीचे लोक मध्यम उंचीचे, काळ्या रंगाचे असून चेहऱ्याची ठेवण बरीचशी द्रविडांप्रमाणे असते. ह्यांना पूर्वीच्या पल्लवांचे वंशज मानले जाते. त्यांच्यात देवकपद्धती आहे.

मुलामुलींची लग्ने वयात आल्यानंतरच होतात. मामे बहिणीशी लग्न करण्याची पद्धत आहे. लग्नाच्या अगोदरच देज द्यावे लागते. बायकोच्या बहिणीशी लग्न करण्याची पद्धत आहे. बहुपत्नीत्वाची चाल आहे.

जमातीचे प्रमुखत्व वंशपरंपरेने चालत आलेले असते. विवाहविषयक व मृत्युविषयक विधी धर्मगुरूकडूनच केले जातात.

आजाऱ्याला औषधपाणी न करता तंत्र-मंत्र, जादूटोणा, बळी देणे इ. उपाय करतात. मरणानंतर प्रेत पुरतात व त्याच्या शेजारी धान्य व पाणी ठेवतात. भूतपिशाचावर व पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास आहे.

संदर्भ : Luiz, A. A. D. Tribes of Kerala, New Delhi, 1962.

लेखिका : सुमति कीर्तने

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश