अंदमान बेटावर राहणारी एक वन्य जमात. १९६१च्या जनगणनेनुसार त्यांची संख्या १२९ होती. त्यांची संख्या वाढावी म्हणून सरकारतर्फे प्रयत्न चालू आहेत. ओंगी पुरुष सर्वसाधारणपणे १४८ सेंमी. व स्त्रिया १३९ सेंमी. उंच असतात. निग्रोंसारखे केस, काळा रंग, लहान व रुंद चेहरा, गोल डोके, चपटे व रुंद नाक, जाड ओठ ही त्यांची शरीरवैशिष्ट्ये होत. स्त्रियांचे नितंब इतके मोठे व मागे वाढलेले असतात, की त्यांवर लहान मुले सहज उभी राहू शकतात. शारीरिक वैशिष्ट्यांच्या बाबतीत ओंगी व आफ्रिकेतील पिग्मी लोकांत बरेच साम्य आढळते. काहींच्या मते पूर्वी सबंध दक्षिण आशियात राहणाऱ्या आदिकालीन वंशाचे उत्तरजीवी लोक म्हणजे हे ओंगी होत.

मासे, कासव, रानटी डुक्कर, कंद, मध इ. त्यांचे प्रमुख अन्न असते. एका मोठ्या झोपडीत चार-पाच कुटुंबे एकत्र राहतात. प्रत्येक कुटुंबाला झोपण्यासाठी एक वेताचा ओटा असतो. ओंगी पुरुष लंगोटी वापरतात, तर स्त्रिया नारळाच्या किंवा खजुरीच्या पानांनी आपली लज्जा झाकतात. पांढऱ्या व लाल मातीने चेहरा व कधीकधी पूर्ण शरीर रंगविण्यात येते. या मातीचा औषधी उपयोगही होतो.

ओंगी खेड्यात सर्वसाधारणत: दहा कुटुंबे राहतात. प्रत्येक खेडेगावाची शिकारीची हद्द ठरलेली असते. तसेच नृत्य करण्यासाठी व अन्न शिजविण्यासाठी खेड्यात मध्यभागी एक अंगण असते. विवाह लहान वयात करतात. विधवांना समाजात निकृष्ट स्थान असते. ओंगी मृताला पुरतात आणि नृत्याद्वारे शोकप्रदर्शन करतात.

संदर्भ : 1. Brown, A. R. The Andaman Islanders, London, 1922.

2. Sen, P.K. Land and People of the Andamans, Calcutta, 1962.

३. राजवाडे, माधव, अंदमान ते आनंदमान, मुंबई, १९६७.

लेखक : रामचंद्र मुटाटकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश