(२१ सप्टेंबर १९०२). सामाजिक मानवशास्त्रातील एक नामवंत इंग्रज संशोधक. जन्म ससेक्स परगण्यातील क्रोबर येथे. शिक्षण ऑक्सफर्ड येथे. त्यांनी संशोधनानिमित्त आफ्रिकेत खूप प्रवास केला. १९३० — ३३ या काळात कैरो येथील विद्यापीठात व १९४६ पासून १९७० पर्यंत ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक.

एव्हान्झ-प्रिचर्ड हे प्रख्यात ब्रिटिश सामाजिक मानवशास्त्रज्ञ रॅडक्लिफब्राउन यांचे शिष्य. परंतु संशोधनपद्धती, समाजाचे विश्लेषण, परकीय संस्कृतिवैशिष्ट्यांचे योग्य आकलन, समुदायात आढळणारे संघर्षात्मक गट; तसेच आदिवासी जमातींत दिसून येणाऱ्या जादूटोण्यासारख्या विशेषांची मूलभूत सुसंगती यांविषयी त्यांचे विचार स्वतंत्र आहेत. समाजरचनेच्या विश्लेषणात मानसशास्त्रीय दृष्टिकोन, जमातीच्या जुजबी भाषाज्ञानापेक्षा तिच्या समग्र तात्त्विक-धार्मिक श्रद्धास्थानांचे आकलन, जमातीतील गटागटांतील संघर्षाचे सामाजिक महत्त्व यांसारखे महत्त्वाचे दृष्टिकोन त्यांनी दक्षिण सूदानमधील न्युयेर जमातीवरील अभ्यासात मांडले. अझांडे जमातीच्या अभ्यासात जादूटोणादिकांचे सामाजिक नियंत्रणाच्या दृष्टीने असलेले महत्त्व त्यांनी दाखवून दिले.

त्यांचे काही नावाजलेले ग्रंथ विचक्राफ्ट : ऑरेकल्स अँड मॅजिक अमंग द अझांडे (१९३७), द न्युयेर (१९४०), द पोझिशन ऑफ विमेन इन सोशल अँथ्रॉपॉलॉजी (१९६२), थिअरीज ऑफ प्रिमिटिव्ह रिलिजन (१९६५) हे आहेत. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय मानसन्मान लाभले आहेत.

लेखक : मा. गु.कुलकर्णी

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश