सखूबाईची गोष्ट सखूबाई आणि रामभाऊ ह्यांच्या कुटुंबात एक वर्षाची एक मुलगी, रामभाऊंची आई आणि रामभाऊंची १० वर्षाची एक बहीण एवढी माणसे नांदत होती. त्यांची दोन एकर जमीन होती आणि ती बैलगाडी सुद्धा होती. दर वर्षी ते सावकाराकडून १०% व्याजाने पैसे घेत असत आणि त्यातून बी-बियाणे, खतपाणी, औषध फवारणी वगैरे शेतीची खरेदी करीत. कामंही पार पडत. पण पिकाचे पैसे आले की कर्जाची परतफेड करण्यातच सगळे पैसे संपून जात. अचानक एके दिवशी रामभाऊंची आई वारली. आता क्रिया-कर्माला आणि बाराव्याला पैसा कुठून आणायचा, हा मोठाच प्रश्न पुढे उभा राहिला. बिचाऱ्या रामभाऊंनी एक एकर जमीन गहाण ठेवली आणि पैसा उभा केला. काही काळानंतर जेव्हा रामभाऊंच्या कुटुंबात नवं बाळ जन्माला आलं, तेव्हा त्याच्या औषधपाण्यासाठी, घराच्या दुरुस्तीसाठी आणि अशाच सांसारिक अडीअडचणींसाठी पैसा अपुरा पडू लागला. दर वेळेस खर्चाचे प्रमाण वाढत होते आणि महागाई पण वाढत होती. दाणे विकून आलले पैसे किती पुरणार? शिवाय दर वर्षी पिकाचं प्रमाण कमी कमी होत चालले होते. शेवटी कर्जफेड करण्यासाठी उरलेली एक एकर जमीन विकावी लागली. दोन वर्षांनी त्यांची १४ वर्षांची बहीण लग्नाला आली. वेळेवारीच लग्न करायला हवं म्हणून त्यांनी तिचं लग्न करायचं ठरवलं. हुंड्यापांड्यासाठी आणि लग्नाच्या खरेदीसाठी त्यांनी उसाच्या कंत्राटदाराकडून उचल घेतली. सगळं कुटुंबच आता उसतोडणीच्या कामावर जाऊ लागले. मरेस्तोवर कष्ट आणि उपासमार सोसूनही त्यांचं आजारपण वाढत राहिलं. गरजा वाढत राहिल्या. जमा आणि खर्चाची तोंडमिळवणी करताना त्यांच्या नाकी नऊ आले. या सावकारी पाशातून बाहेर कसं पडावं, ते सखुबाईंना कळेना. प्रश्न: १.कोणत्या गोष्टींमुळे व्यक्तीची गरिबी दिवसेंदिवस वाढत जाते? २.ह्या प्रकरणाभ्यासाचा आणि आपल्या गावाच्या परिस्थितीचा काही संबंध आहे का? किती प्रमाणात? ३.ह्या दुष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी कोणते मार्ग शोधाल? लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट स्त्रोत : थेंबे थेंबे तळे साचे - पुस्तिका