रत्नागिरी जिल्ह्यात 'पार्थ पापड' हे नाव परिचीत झालंय. चिपळूणमधील वालोपे गावात सहा वर्षापूर्वी सुरू झालेल्या या गृह उद्योगाचा विस्तार वेगाने होत आहे. परिश्रम आणि नियोजनाने उद्योगाला यशाच्या वाटेवर पुढे नेणाऱ्या संचालिका रसिका तांबट यांचा नुकताच राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. रसिका तांबट यांचे शिक्षण तसे मर्यादीतच. मात्र व्यवसायाची आणि नियोजन कौशल्य आत्मसात करण्याची आवड असल्याने लग्नानंतर त्यांनी कुटुंबात सुरू असलेल्या पापड विक्री व्यवसायात लक्ष घातले. पूर्वी इतर लोकांकडून पापड करून ते विक्री करताना बरेचदा ग्राहकांची मागणी असूनही त्याप्रमाणात उत्पादन वेळेवर प्राप्त होत नसल्याने विक्रीला मर्यादा येत असत. त्यामुळे स्वत:च उत्पादन क्षेत्रात उतरण्याच्या विचाराने रसिका यांनी 2006 मध्ये जुने पापड यंत्र खरेदी केले. मात्र या व्यवहारात त्यांना 75 हजार रुपयांचे नुकसान सोसावे लागले. शिवाय 15 दिवस व्यवसाय बंद ठेवावा लागला.अपयश पदरी पडूनही त्यामुळे हार न पत्करता त्यापासून योग्य धडा घेत रसिका यांनी नव्याने व्यवसाय सुरू करण्याचे नियोजन केले. 2009 मध्ये वालोपे येथे जागा भाड्याने घेऊन त्याठिकाणी नवे युनिट सुरू करण्यात आले. त्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि बँक ऑफ बडोदाने आर्थिक सहकार्य केले. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत खादी व ग्रामोद्योग मंडळाने या उद्योगासाठी 10.08 लाख रुपयाचे आर्थिक साहाय्य केले. मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आवश्यक मार्गदर्शनदेखील केले. उद्योगासाठी लागणारे स्वयंचलित यंत्र बसविण्यात आल्याने पापडाचे पीठ मळण्यापासून पापड वाळविण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रीया यंत्राद्वारे होऊ लागल्याने उत्पादनाचा वेग वाढला. पूर्वी तोट्यात असलेल्या उद्योगाला परत एकदा चांगले दिवस आले.आज रसिका महिला गृह उद्योगाच्या माध्यमातून 13 महिलांना रोजगार मिळाला आहे. दररोज 200 किलो पापड तयार केले जात आहेत. एका महिन्याची उलाढाल चार लाखापर्यंत पोहोचली आहे. या प्रकल्पात तयार होणारे पापड रत्नागिरीखेरीज सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या बाजारात विक्रीसाठी जातात. दिवसेंदिवस मागणी वाढत असल्याने या उद्योगाचा आणखी विस्तार करण्याचा आणि संपूर्ण राज्यात आपला पापड पोहोचविण्याचा मनोदय श्रीमती तांबट यांनी बोलून दाखविला. त्यांच्या या यशाच्या उंचावत जाणाऱ्या आलेखामुळे इतरही महिलांना उद्योगाची प्रेरणा मिळते आहे. म्हणूनच पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत ज्या ग्रामिण उत्कृष्ट उद्योजकांना महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत आर्थिक सहाय्य देवून उद्योग उभारणीसाठी हातभार देण्यात आलेले होते त्यापैकी उत्कृष्ट उद्योजिका म्हणून रसिका तांबट यांची खादी ग्रामोद्योग आयोग नवी दिल्ली यांचेमार्फत उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. नुकताच संसद भवन येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.एक नवे ध्येय घेऊन या 'यशस्वीनीची' वाटचाल सुरू आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि अदम्य आत्मविश्वासाच्या बळावर यशाचे अनेक टप्पे ओलांडीत त्यांनी आपल्या उद्योगाला या टप्प्यापर्यंत पोहोचविले, त्यासाठी आपले सर्व कौशल्य पणाला लावले. याच कौशल्याच्या बळावर उद्या चिपळूणचा पापड मुंबई किंवा दिल्लीत दिसू लागला तर आश्चर्य वाटू नये. पुरस्काराद्वारे एरवी दिल्ली तर जिंकलीच आहे...लेखक : - डॉ.किरण मोघे माहिती संकलक : अतुल पगार स्त्रोत : महान्यूज http://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=mmdrgXqcnf8=