लग्नातील रुखवत तयार करण्याची कला हळू हळू लोप पावत असताना एका फॉशन डिझायनर महिलेने,ह्या कलेचे जतन आणि संवर्धन केले आहे.शिवाय टाकाऊ पासून टिकावू आणि तेही भलतेच विकाऊ असलेल्या प्रोडक्ट्सचा वेगळा गृहउद्योग थाटून अनेक महिलांनाच्या हाताला काम दिले आहे. त्यांचे नाव आहे सौ.सुषमा विजयसिंह गहेरवार. कल्पकता आणि हस्तकलेतील कसब यामुळे त्या ‘गृहउद्योगस्वामिनी’ मानल्या जात आहेत. दहावी नापास असताना, सुषमा चौहान यांचा विवाह नांदेडचे विजयसिंह गहेरवार यांच्यासोबत ठरला.तेंव्हा घरातील लोक म्हणाले,’सुषमा, तुझा भावी पती इंजिनीअर आणि तू दहावी पासही नाहीस.’ही गोष्ट मनला लागून चार वर्षाच्या खंड पडूनही त्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्या पास झाल्या.त्याआधी सोलापूरच्या आय. टी.आय.मधून फॅशन डिझायनरचा डिप्लोमा पूर्ण करून प्राविण्य मिळविले होते. लग्न झाल्यावर डिग्री पर्यंत शिक्षणही घेतले. सासरी नांदेडला आल्यावर शिवणकाम करीत आणि शिकवत त्यांची कमाई सुरु झाली .दरम्यान शालिनी जयस्वाल यांच्या खासगी क्लास मध्ये जाऊन एम्ब्रायडरीचे प्रशिक्षण घेतले .पती सरकारी नोकरीत होते त्यामुळे शिवणकाम आणि एम्ब्रायडरी यांच्यातून जमलेल्या कमाईतून श्याम नगर भागात १५ अगस्त १९९५ ला ‘सोनी फॅशन सेंटर’ काढले.यावर आपल्याच हस्त कौशल्यातून तयार झालेल्या वस्तू विक्रीस ठेवल्या . त्याची मागणी वाढत होती त्यामुळे रुखवत आणि हस्तकलेच्या अनेक वस्तू तयार करणाऱ्या आपल्या आईला त्यानी नांदेडला बोलावून घेतले .हा गृहउद्योग अधिक विस्तारावा म्हणून या दुकानच्या बाजूलाच २००२ मध्ये ‘झाशी सहकारी महिला गृहउद्योग व स्वयंरोजगार संस्था’ ही रजिस्टर संस्था सुरु केली. या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण माहेरच त्यांनी नांदेडला आणले.आई सुशीला चौहान ,दोन भाऊ सुनिलसिंह व सचिनसिंह चौहान दोन भावजया मेधा व कांचन चौहान,सासू राजाराणी गहेरवार इत्यादी घरच्याच लोकांच्या हस्त कौशल्यावर हा गृहउद्योग सुरु केला . आपल्या जवळील हस्तकौशलये समाजातील गरजू ,होतकरू ,विधवा ,परित्यक्ता व गरीब महिलांना शिकवून त्यांच्या हाताला काम देत हा गृहउद्योग सुषमाजींनी वाढत वाढवत नेला आहे. नांदेडच्या यशवंत कालेज रोड वरील ‘झाशी महिला सहकार गृहउद्योग व स्वयंरोजगार संस्थेला मी भेट दिली.तेथील महिला ,मुली वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घेत होत्या. तयार होणारे प्रोडक्ट टाकाऊ पासून टिकवू तरी भलतेच विकाऊ होते. व्हाईट सॉक्स डॉल वापरून फेकून द्यायचे पांढरे सॉक्स व सॅटीन रिबीन टिकल्या ,लेस,कव्हर ,थर्माकुल,वगैरे मटेरियल वापरून हाताने बनवलेली व्हाईट सॉक्स डॉल १७० रुपयात तयार होते आणि २२० रुपयांना विकते. गोल्डन पीस बुकेचा बेस वापरून तयार केलेला चमकत्या टिकल्यांच्या गोल्डन पीस १०० रुपयांत बनतो आणि दुप्पट किंमतीत विकतो. मोळीचा गणपती हातानेच बनविलेला मोळीचा गणपती विना पॅकिंग २५० रुपयांना तर पॅकिंग केल्यावर ४०० रुपयांना विकतो. डेकोरेटीव पानाचे तबक बनवायला २५० खर्च येतो आणि ते विकते ३५० रुपयांना. वीस रुपयांत हातानी बनविलेल्या एक किलो वळवटाला २०० रुपये मिळतात . हळदी कुंकवाचे हँडमेड करंडे १०० रुपयांच्या मटेरियल मध्ये तयार होतात आणि १८० रुपयांना विकतात असेच टाकाऊ पासून बनविलेले अनेक शोपीसेस भलताच भाव खात आहेत.सुषमाजी एका मिनिटात रंगीत कागदाचे फुल तयार करीत होत्या.त्यांच्या प्रशिक्षित महिलाही वेगाने ही फुले बनवत होत्या.आजवर अशी फुले आम्ही लाखांनी विकली . या ठिकाणी ‘रंगीला मेहंदी कोन’ तयार होतात. लगीनसराई ,नागपंचमी राखीपौर्णिमा ,भीम जयंती ,रमजान ईद ,ख्रिसमस, अशा सर्व धर्मियांच्या सणाला, हाजारो मेहंदी कोन विकतात. सुषमाजी सांगत होत्या ,’लोप पावत जाणारी लग्नाचे रुखवत बनविण्याची कला.मी माझ्या आईकडून शिकले ती कला मी स्वत: ,माझी आई ,भावजया , इथे महिलांना शिकवतो .ज्यातून शेकडो महिलांच्या हाताला काम आणि दाम पण मिळतात.घरी बसून या महिला रुखवताचे वेगवेगळे समान बनवून आणून देतात .त्यांना त्यांच्या मटेरियल आणि मेहनतीचा मोबदल देऊन आम्ही ते विकत घेतो . ज्यांच्या कडे शिकायला पैसे नसतात अशा मोलकरणीच्या किंवा अन्य मुलींना, ‘झाशी महिला उद्योग स्वयंरोजगार केंद्रावर मुख्य प्रशिक्षकांच्या हाताखाली कामाला ठेवले जाते.त्यांना मोफत हस्तकौशल्ये शिकविली जातात. सध्या अनिता नावाची मुलगी इथे शिकत आहे. शिकताना ज्या वस्तू तयार केल्या त्याची किंमत ती आपल्या आईला देऊन आर्थिक मदत करत आहे.प्रशिक्षण पूर्ण होताच या मुलीने तयार केलेल्या सर्व वस्तू ‘सोनी फॅशन सेंटर’ मार्फत विकून दिल्या जाणार आहेत. अनेक म्हातार्या आजीही इथे हातानी कापसाच्या वाती तयार करून आणून देतात. त्यातून चार पैसे कमावतात . वयाच्या २३ व्यावर्षी पतीचे निधन झाले अशा राखी ठाकूर आणि कविता ठाकूर यांनी इथेच प्रशिक्षण घेऊन स्वत:चा गृह उद्योग निर्माण केला आहे. या दोघीही आपली हस्तकौशल्ये वापरून स्वावलंबी जीवन जगत आहेत. मेधा चौव्हाण यांच्या कन्या,विवाह नंतर मुदखेड यथे स्वताचे दुकान थाटून स्वावलंबी जीवन जगत आहेत.विमल सूर्यवंशी ,राखी कोटलावर ,यांनी सुषमाजीकडे शिकून प्रशिक्षण वर्ग काढले आहेत सुषमाजी शाळाशाळात जाऊन मुलांना मोफत हस्तकलेचे धडे देतात . ‘शिका व कामावा’ चा मंत्र देतात.अगदी अंध विद्यालयातील मुला-मुलींनाही दहा दिवसांचे प्रशिक्षण वर्ग घेऊन त्यांनी हस्तकलेचे धडे दिले आहेत.प्रज्ञाशील बचत गटाच्या ५००० महिलांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. महिलांना त्यांच्या स्वयंरोजगार केंद्रावर पेंटिंग , एम्ब्रायडरी,,टेलरिंग ,साडी प्रिंटींग,कपड्यांची खेळणी ,बाहुल्या ,शोकेसेस मध्ये ठेवायचे प्राणी , अशा किती तरी वस्तू तयार करायला शिकवतात .आणि या महिलांनी तयार केलेल्या वस्तू,योग्य मोबदल देऊन विकत घेतल्या जातात. माजी जिल्हाधिकारी तानाजी सत्रे ,त्यावेळचे नांदेडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नाहटा यांनी ११ महिला घेऊन ‘झाशी सहकारी महिला गृहउद्योग व स्वयंरोजगार संस्था’ स्थापन करण्याचे मार्गदर्शन दिले तसेच माजी मंत्री व आमदार डी.पी सावंत यांनी दिलेल्या प्रोह्त्सानामुळे मी इथवर पोचले असे सुषमाजी म्हणाल्या . या कामाशिवाय समाज सेवेची आवड असलेल्या, सुषमाजीनी झाशी महिला ग्राम विकास प्रतिष्ठान मार्फत असंख्य वृक्षारोपणाचे कार्यक्रम ,रक्तदान शिबिरे ,एकात्मता रॉलीचे आयोजन ,जेल मध्ये जाऊन कैद्यांना राखी बांधण्याचे कार्यक्रम ,कैदी महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण ,२००९ मध्ये माळी गावावर डोंगर कोसळून आलेल्या संकटात मदत फेरी काढून ५६ हजार रुपयांची मदत जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत देण्यात आली आहे. झाशी अन्नपूर्णा चॉरिटेबल ट्रस्ट मार्फत उत्तराखंडमधील आपद्ग्रस्तांना मदत केली आहे. याच ट्रस्ट मार्फत सुषमाजीनी देवी रत्नेश्वरी डोंगराच्या पायथ्याशी १० एकर जागेत अन्नपूर्णा मन्दिर बांधून तिथे गोशाळा काढली आहे.या परिसरातील जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा मोठा हौद तयार केला आहे. इथेच ना नफा ना तोटा तत्वावर चालणारे मंगल कार्यालय उभे होत आहे.या निसर्गरम्य परिसरात ज्यांची मुले परदेशात निघून गेली अशा वृद्ध लोकांसाठी ‘स्वीट होम’ वृधाश्रम काढण्याचा त्यांचा मानस आहे. या सर्व कामात त्यांचे पती विजयसिंह गहेरवार यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभते आहे.त्यांना या कार्याबद्दल अहल्याबाई होळकर पुरस्कार व अनेक पुरस्कार तसेच सत्कार लाभले आहेत.एका महिलेने ,महिलांचा गृह उद्योग काढून महिलांसाठी सुरु केलेल्या रोजगार निर्मितीच्या सुषमाजींच्या या कार्याला शुभेच्छा! लेखक - सु. मा. कुळकर्णी म.टा.प्रतिनिधी,नांदेड.