वक्फ-संपत्तीच्या उद्दिष्टांची पूर्ती व समर्पणसमयीच्या निदेशांचे पालन ज्या व्यक्तीकडे सोपविले असते, त्या व्यक्तीस मुसलमानी विधीत सामान्यपणे 'मुतवल्ली' अशी संज्ञा आहे. मुतवल्ली केवळ व्यवस्थापक असून विश्वस्त नसल्यामुळे वक्फ-संपत्ती त्याच्यामध्ये निहित होत नाही [⟶ वक्फ].

मुतवल्लीची नियुक्ती वक्फ-संस्थापक, तो नसल्यास मृत्युशय्येवरील मुतवल्ली अगर न्यायालय करू शकतात. धर्मकृत्ये करण्याची आवश्यकता नसल्यास स्त्रिया किंवा मुसलमानेतरसुद्धा मुतवल्ली होऊ शकतात. सर्वसाधारणपणे मुतवल्लीचे पद वंशपरंपरेने जात नाही; ते हस्तांतरित करता येत नाही; अगर जप्तही करता येत नाही. मात्र मुतवल्ली प्रतिनिधी नेमू शकतो. धनकोने मुतवल्लीला उद्दिष्टपूर्तीसाठी दिलेले पैसेही तो वक्फ-संपत्तीतून मागू शकत नाही. मुतवल्लीविरुद्ध वक्फ-संपत्ती अगर हिशेब यांसाठी दाखल करावयाच्या वादाला मुदती प्रतिबंध असत नाही. अपकार्य किंवा विश्वासघात केल्यास न्यायालय त्याला पदावरून दूर करू शकते.

लेखक : ना. स.श्रीखंडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश